रेल्वेने तिकीट बुकिंगचा नियम बदलला, स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये लागू; तुम्हीही लाभ घेऊ शकता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 17:20 IST2026-02-17T17:05:00+5:302026-02-17T17:20:48+5:30
Sleeper Vande Bharat Ticket Booking New Rules: स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या तिकीट बुकिंग नियमांत पुन्हा एकदा बदल करण्यात आले आहेत.

Sleeper Vande Bharat Ticket Booking New Rules: आताच्या घडीला चेअर कार वंदे भारत ट्रेन आणि वंदे भारत स्लीपर ट्रेन यांना प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. प्रवाशांच्या फीडबॅकनंतर यामध्ये काही बदलही रेल्वेने केले आहेत.

देशातील वातानुकूलित वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे भाडे इतर देशांच्या तुलनेत स्वस्त आहे. सर्व बाबींचा विचार करूनच भाडे निश्चित करण्यात आले आहे, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच सांगितले. यानंतर आता स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या तिकीट नियमात बदल करण्या आले आहेत.

भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा प्रवाशांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक महत्त्वाचा बदल केला आहे. देशातील सर्वांत आधुनिक ट्रेन वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत एक्सप्रेसमध्ये आपत्कालीन कोटा सुरू करण्यात आला आहे.

आतापर्यंत फक्त महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि ड्युटी पाससाठी कोटा होता. आपत्कालीन किंवा आरएसी सुविधा उपलब्ध नव्हत्या, ज्यामुळे शेवटच्या क्षणी तिकीट बुकिंग करणे जवळजवळ अशक्य होत होते. प्रवाशांच्या वाढत्या मागणीनंतर, रेल्वे बोर्डाने नियमांमध्ये सुधारणा केली आहे. नवीन तरतुदीनुसार काही बर्थ विशेषतः आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवले जाणार आहेत. सात किंवा त्याहून अधिक स्लीपर कोच असलेल्या अमृत भारत ट्रेनमध्ये आता आपत्कालीन कोट्याअंतर्गत २४ बर्थ राखीव असतील.

वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये आठवड्यातील कामकाजाचे दिवस आणि वीकेंड दिवस अशी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. फर्स्ट एसीमध्ये कामकाजाच्या दिवशी ४ आणि वीकेंड दिवशी ६ बर्थ राखीव असतील. सेकंड एसीमध्ये सामान्य दिवशी २० आणि वीकेंड दिवशी ३० बर्थ राखीव असतील. थर्ड एसीमध्ये, आपत्कालीन कोट्यात २४ बर्थ कामाच्या दिवशी आणि वीकेंड दिवशी ४२ बर्थ राखीव असतील.

रेल्वेने झोनल अधिकाऱ्यांना प्रवाशांच्या मागणीनुसार वेळोवेळी कोट्यांचा आढावा घेण्याचे आणि समायोजित करण्याचे अधिकार दिले आहेत. या निर्णयामुळे कौटुंबिक आजार, आपत्कालीन परिस्थिती किंवा तातडीच्या सरकारी कामामुळे अचानक प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

या निर्णयानंतर, आता गंभीर आजार, कुटुंबात अचानक आपत्कालीन परिस्थिती किंवा व्हीआयपी ड्युटी अशा परिस्थितीत प्रवाशांना या ट्रेनमध्ये प्राधान्याने कन्फर्म सीट मिळू शकतील. रेल्वेचा हा निर्णय केवळ प्रवाशांच्या तक्रारींवर उपाय नाही, तर वंदे भारत आणि अमृत भारत सारख्या आधुनिक ट्रेन सर्वसामान्यांसाठी अधिक व्यावहारिक बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

आपत्कालीन कोटा लागू केल्याने तातडीच्या कारणांसाठी शेवटच्या क्षणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. प्रवाशांना आता शेवटच्या क्षणी प्रवास करण्याची चिंता करावी लागणार नाही. आपत्कालीन कोटा प्रत्येकासाठी नाही. मेडिकल इमरजन्सी, कौटुंबिक आपत्कालीन परिस्थिती, सरकारी ड्युटी आणि व्हिआयपी लोकांसाठी हा कोटा उपयुक्त ठरतो.

आतापर्यंत या नवीन आणि आधुनिक ट्रेनमध्ये स्पष्ट आपत्कालीन कोटा नव्हता, ज्यामुळे प्रवाशांना तातडीच्या गरजेनुसार निश्चित जागा मिळवणे कठीण झाले होते. नवीन निर्णयानंतर इतर प्रीमियम ट्रेनप्रमाणे आता वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये आता आपत्कालीन कारणांसाठी काही जागा राखीव असतील.

आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला तिकिटाची आवश्यकता असल्यास प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे. सर्वप्रथम तुम्हाला एक लेखी अर्ज द्यावा लागेल. जर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असेल तर डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन किंवा इतर महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवा.

हा अर्ज संबंधित रेल्वे विभागाच्या डीआरएम कार्यालयात किंवा मुख्य आरक्षण पर्यवेक्षकाकडे सादर करावा लागेल. ही प्रक्रिया चार्ट तयार होण्याच्या किमान ३-४ तास आधी पूर्ण करणे आवश्यक आहे.

दरम्यान, देशातील काही चेअर कार वंदे भारत ट्रेन २० कोचच्या केल्या जात आहेत. तर २४ कोचची स्लीपर वंदे भारत ट्रेन आणण्याची योजनाही रेल्वेकडून आखली जात आहे. पुढील काही वर्षांत तब्बल ८०० वंदे भारत ट्रेन बांधून प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा संकल्प भारतीय रेल्वेचा आहे. तसेच एकूण २६० वंदे भारत स्लीपर ट्रेन रेक बांधण्याची योजना आहे.

















