प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 10:21 IST2026-01-01T10:08:20+5:302026-01-01T10:21:43+5:30
Big Changes In Indian Railway Time Table From 01 January 2026: ०१ जानेवारी २०२६ पासून अनेक ट्रेनच्या वेळापत्रकात बदल झालेला आहे. पुणे-मुंबईतील किती आणि कोणत्या ट्रेनवर याचा परिणाम होईल? जाणून घ्या...

Big Changes In Indian Railway Time Table From 01 January 2026: २०२६ या नवीन वर्षात रेल्वे प्रवासाची योजना आखत आहात का? एक्स्प्रेस आणि मेमू गाड्यांचे वेळापत्रक नक्की तपासा. रेल्वे ट्रेनचा वक्तशीरपणा सुधारण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी नवीन वर्षाच्या १ जानेवारी २०२६ पासून वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रकांचे पुनरावलोकन करण्याचे आवाहन प्रवाशांना करण्यात आले आहे.

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवास अधिक सुलभ होण्यासाठी नियमांमध्ये बदल करत असते. ०१ जानेवारी २०२६ पासून भारतीय रेल्वेने अनेक ट्रेनच्या वेळांमध्ये बदल केला आहे. या नवीन टाइमटेबलमुळे सुमारे ६२ एक्स्प्रेसचा वेग वाढणार आहे. या बदललेल्या वेळापत्रकात मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश आहे.

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक प्रमुख प्रवासी ट्रेनच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत, जे १ जानेवारी २०२६ पासून लागू होतील. क्रॉसिंगवरील ताण कमी करण्यासाठी आणि एकाच विभागात अनेक ट्रेन एकाच वेळी चालवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे. एकाच विभागात जास्त ट्रेन धावतात तेव्हा विलंब होण्याची शक्यता वाढते. नवीन वर्षाच्या वेळापत्रकात बदल हा या समस्येवर उपाय म्हणून केला जात आहे.

प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन हा बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यामुळे अनेक ट्रेनचा विलंब पूर्णपणे कमी होईल. प्रवाशांचा प्रतीक्षा वेळ बराच कमी होईल. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, काही ट्रेन आता पूर्वीपेक्षा लवकर निघतील. याव्यतिरिक्त, अनेक ट्रेनचे आगमन आणि सुटण्याच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

प्रवाशांना NTES, IRCTC वेबसाइट, रेल्वे हेल्पलाइन आणि जवळच्या स्टेशनवरून माहिती मिळू शकते. या बदलामुळे, हावडा, शालीमार, टाटानगर आणि राउरकेला येथून निघणाऱ्या आणि थांबणाऱ्या २४ ट्रेन ५ ते १५ मिनिटे ते अर्ध्या तासाचा बदल करण्यात आला आहे. रेल्वेने स्पष्ट केले की, हे सुधारित वेळापत्रक ऑपरेशनल सोयीसाठी आणि तांत्रिक कारणांसाठी लागू केले जात आहे.

ट्रेन क्रमांक २२८३० शालीमार भुज सुपरफास्ट एक्सप्रेस शालीमार स्टेशनवरून सायंकाळी ०७.५५ ऐवजी ०७.५० वाजता निघेल. ट्रेन क्रमांक २०९७२ शालीमार उदयपूर एक्सप्रेस शालीमार स्टेशनवरून सायंकाळी ०७.५५ ऐवजी ०७.५० वाजता निघेल. ट्रेन क्रमांक १२९०६ हावडा पोरबंदर ओखा एक्सप्रेस हावडा स्टेशनवरून रात्री ०८.२० ऐवजी रात्री ०८.१५ वाजता निघेल.

ट्रेन क्रमांक २२९०६ शालीमार - ओखा सुपरफास्ट एक्सप्रेस ही शालीमार स्टेशनवरून रात्री ०८.२० ऐवजी रात्री ०८.१५ वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक १२८१३ हावडा टाटानगर स्टील एक्सप्रेस हावडा स्टेशनवरून संध्याकाळी ०५.२० ऐवजी ०५.१० वाजता निघेल. ट्रेन क्रमांक १८१८५ टाटानगर - गोड्डा एक्सप्रेस ही टाटानगर स्टेशनवरून दुपारी २.०० ऐवजी दुपारी १.५५ वाजता सुटेल.

ट्रेन क्रमांक १२१५२ हावडा मुंबई लोकमान्य टिळक समरसत्ता एक्सप्रेस हावडा स्टेशनवरून सायंकाळी ०७.३५ ऐवजी संध्याकाळी ०७.२५ वाजता निघेल. ट्रेन क्रमांक १२१०२ हावडा मुंबई लोकमान्य टिळक ज्ञानेश्वरी एक्सप्रेस हावडा स्टेशनवरून रात्री ०८.२० ऐवजी रात्री ०८.१५ वाजता निघेल. ट्रेन क्रमांक १२२६२ हावडा - मुंबई सीएसएमटी दुरांतो एक्सप्रेस हावडा स्टेशनवरून सकाळी ५.४५ ऐवजी सकाळी ०५.३५ वाजता निघेल.

ट्रेन क्रमांक १२१२९ पुणे हावडा आझाद हिंद एक्सप्रेस सकाळी ५.१० ऐवजी सकाळी ५.२५ वाजता हावडा स्थानकावर पोहोचेल. ट्रेन क्रमांक २०८९४ पाटणा - टाटानगर वंदे भारत एक्सप्रेस टाटानगर स्टेशनवर ०९.३० ऐवजी ०९.४० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक २०८९१ टाटानगर - ब्रह्मपूर वंदे भारत एक्सप्रेस टाटानगर स्टेशनवरून दुपारी ०२.३० ऐवजी ०२.२० वाजता निघेल. ट्रेन क्रमांक २०८९२ ब्रह्मपूर - टाटानगर वंदे भारत एक्सप्रेस दुपारी २.४० ऐवजी दुपारी २.५० वाजता टाटानगर स्टेशनवर पोहोचेल.

दरम्यान, रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे मंत्रालयाने सवलत योजना आणली असून, रेलवन अॅपच्या माध्यमातून अनारक्षित तिकिटे खरेदी करणाऱ्या प्रवाशांना ३ टक्के सूट देण्यात येणार आहे. डिजिटल तिकीट बुकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा आढावा मे २०२६ मध्ये घेण्यात येणार आहे.

ही सवलत १४ जानेवारी ते १४ जुलै २०२६ या कालावधीत लागू राहणार असून यामुळे प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. सध्या रेल वन अॅपवर आर-वॉलेट वापरून अनारक्षित तिकीट बुक केल्यास ३ टक्के कॅशबॅक दिला जातो. रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ही कॅशबॅक योजना पूर्वीप्रमाणे सुरूच राहणार आहे.

फक्त रेलवन अॅपवरच ही सवलत उपलब्ध असेल. कोणत्याही डिजिटल पेमेंट मोडद्वारे (यूपीआय, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आदी) तिकीट खरेदी केल्यास थेट ३ टक्के सूट मिळणार आहे. इतर कोणत्याही ऑनलाइन अनारक्षित तिकीट प्लॅटफॉर्मवर ही योजना लागू नाही. ३ टक्के सूट अॅपवर केलेल्या सर्व डिजिटल पेमेंट मोडसाठी असेल.
















