सावधान! आता पीएफ अ‍ॅडव्हान्स काढाल तर 10 वर्षांनी पस्तावाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 10:28 AM2020-04-24T10:28:22+5:302020-04-24T10:44:03+5:30

पीएफची रक्कम काढल्यास अ‍ॅडव्हान्समधून ही रक्कम मिळणार आहे. मात्र, ही रक्कम परतफेड करण्याची आवश्यकता राहणार नाही.

कोरोना संकटाशी लढताना केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे खासगी कर्मचाऱ्यांवर नोकर कपातीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. तसेच पगार कपातही होण्याची शक्यता आहे. या आर्थिक संकटाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने २.७ लाख कोटींची पॅकेजची घोषणा केली होती.

यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांकडून ईएमआय दिलासा, जनधनसारख्या योजनांतून गरीबांना आर्थिक मदत देण्यात येत आहे. याचबरोबर नोकरदार वर्गाला दिलासा देताना नोकरीवरून कंपन्यांनी कमी करू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनदा आवाहनही केले आहे.

या नोकरदार वर्गाला आर्थिक संकटाशी दोन हात करण्यासाठी पीएफही काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये तीन पगार किंवा ७५ टक्के पीएफची रक्कम यापैकी जी रक्कम कमी असेल ती काढता येणार आहे. यासाठी पीएफकडून कोणताही कर किंवा परतफेडीची अट ठेवण्यात येणार नाही.

ही सुविधा जरी दिलासा देणारी असली तरीही गरज असेल तरच तिचा वापर करवा. गेल्या १५ दिवसांत ईपीएफओने ३.३१ लाख लोकांचे क्लेम मंजूर करत ९४६.४९कोटी रुपये दिले आहेत. मात्र, काही जण दुविधेमध्ये असून हे पैसे काढायचे की नाहीत या विचारात आहेत.

पीएफची रक्कम काढल्यास अ‍ॅडव्हान्समधून ही रक्कम मिळणार आहे. मात्र, ही रक्कम परतफेड करण्याची आवश्यकता राहणार नाही.

कोरोनाच्या संकटामुळे ही रक्कम काढण्याची सूट देण्यात आली आहे. यामुळ या रकमेवर कोणताही टीडीएस भरावा लागणार नाही. पाच वर्षांपेक्षा कमी नोकरीचा काळ असेल तर अशावेळी १० टक्के टीडीएस कापला जातो.

आत प्रश्न उरतो, अ‍ॅडव्हान्स घ्यायचा की नाही? जर तुम्हाला खरोखरच पैशांची गरज असेल तरच पीएफ खात्यातून पैसे काढावेत. मात्र, हा पर्याय सर्वात शेवटी ठेवावा. कारण असे केल्यास त्याचे मोठे नुकसान तुम्हाला सोसावे लागू शकते.

महागाई आणि मंदीच्या या काळात पीएफवर चागले व्याज मिळत आहे. 2019-20 साठी ८.५० टक्के व्याज देण्यात येत आहे. अशावेळी जर तुम्ही तुमच्या खात्यातून ५० हजार रुपये काढले तर भविष्यात तुम्हाला मोठे नुकसान होणार आहे.

जर तुम्ही ५० हजार रुपयांचा पीएफमधून अ‍ॅडव्हान्स घेतला नाही तर १० वर्षांनंतर 1,13,049 एवढी ही रक्कम होणार होती. तर सध्याच्या व्याजदराचा विचार करता २० वर्षांनंतर ही रक्कम 2,55,602 एवढी होणार आहे. तर ३० वर्षांनी ही रक्कम 5,77,913 होईल. म्हणजेच जर तुम्ही आज पैसे काढले तर निवृत्तीवेळी तुम्हाला तब्बल 5,77,913 एवढा तोटा होणार आहे.

केंद्र सरकारने दिलेला ईएमआय दिलासाही आतबट्ट्याचा ठरणार आहे. या दोन्ही सुविधा गरजवंतांसाठी असून त्याचा गैरफायदा घेतल्यास खिशाला मोठा फटका बसणार आहे. यामुळे नोकरी गेली, मोठी पगार कपात झाली तरच या सुविधांचा लाभ घेणे फायद्याचे असणार आहे.