अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 11:25 IST2025-08-01T11:20:04+5:302025-08-01T11:25:38+5:30
America vs India: १९४७ मध्ये स्वतंत्र झालेल्या भारताने दुसऱ्या महायुद्धानंतर जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली निरपेक्ष धोरण अवलंबले आणि तिथेच अमेरिकेला भारत डोळ्यात खुपू लागला होता. या अमेरिकेने भारतीयांना उपाशी मारण्याचा डाव रचला होता.

आज भारतीय लोक बहुतांश अमेरिकेला जात असले, राहत असले तरीही ही अमेरिका काही भारताचा द्वेष करण्यापासून राहिलेली नाही. अगदी स्वातंत्र्यानंतर ते आता स्वातंत्र्याला ७० दशके होऊनही. भारतावर आता २५ टक्के टेरिफ लावणाऱ्या अमेरिकेने एवढी खालची पातळी गाठली होती, की त्याची आठवण जरी झाली तरी तळपायाची आग मस्तकात जाईल. भारताचा गहू रोखण्याचे प्रयत्न, भारतावर चालून येत असलेली युद्धनौका, पोखरणच्या अणुचाचणीवेळी लादलेले निर्बंध आणि पाकिस्तानला भारताविरोधात वापरण्यासाठी पुरवत असलेली शस्त्रे, लढाऊ विमाने एवढी कारस्थाने अमेरिकेने रचलेली आहेत की यादी कमी पडेल.
१९४७ मध्ये स्वतंत्र झालेल्या भारताने दुसऱ्या महायुद्धानंतर जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली निरपेक्ष धोरण अवलंबले आणि तिथेच अमेरिकेला भारत डोळ्यात खुपू लागला होता. या अमेरिकेने भारतीयांना उपाशी मारण्याचा डाव रचला होता. भारत तेव्हा खाद्य सुरक्षित नव्हता. त्यातच १९६५ ला मान्सूनने धोका दिला होता.
या परिस्थितीत पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये ३०००० सैन्य घुसविले होते. भारतीय सैन्याने निकराने लढा देत पाकिस्तानींना पार लाहोरपर्यंत मागे ढकलले होते. लाहोर भारताच्या ताब्यात होते. तेव्हा ही अमेरिका घात लावून बसली होती. अमेरिका तेव्हा भारताला PL-४८० योजनेअंतर्गत गहू पुरवत होती.
भारतात खाद्यान्न पुरेसे नव्हते, यामुळे अमेरिकेने भारताला दिला जाणारा गहूच रोखण्याची तयारी सुरु केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी तत्कालीन पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रींना युद्ध नाही रोखले तर भारताचा गहू बंद करणार अशी धमकी दिली होती. तेव्हा भारतात कृषी क्रांती झालेली नव्हती. आज जे दिसतेय त्याच्या उलट परिस्थिती होती. लोकांची उपासमार होणार होती.
अमेरिका तेव्हा काही चांगला गहू पाठवत नव्हती. गुरे-ढोरेच खाऊ शकतील एवढ्या खालच्या प्रतीचा गहू पाठविला जात होता. परंतू, भारत तेव्हा अडचणीत होता. भारतासमोर ४८ कोटी लोकांना अन्न पुरवण्याचे आव्हान होते. यामुळे भारतीय हा निकृष्ट प्रतीचा गहू खात होते. भारताला आपली माणसे जगवायची होती. त्याही परिस्थितीत शास्त्रींनी आमचा गहू पुरवठा करा असे ठासून सांगितले होते. तसेच अमेरिकेचा गहू घेण्यास नकार दिला होता.
या संकटातूनच शास्त्रींनी "जय जवान, जय किसान"चा नारा दिला. सर्व भारतीय शेतकरी एक केले आणि भारताचा अन्न धान्याच्या स्वावलंबनाकडे प्रवास सुरु झाला. आठवड्यातून एक दिवस उपवास धरा, असे आवाहन शास्त्रींनी देशवासियांना केले होते. त्यांनी स्वतःही उपवास सुरू केला होता, तर पत्नीला एक दिवस अन्न शिजवू नको असे सांगितले होते.
या प्रसंगानंतर पोखरणच्या अणुचाचणीवेळी देखील अमेरिकेने भारताला त्रास दिला होता. १९७४ च्या सुरुवातीला, जेव्हा भारताने इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली पहिली अणुचाचणी केली गेली तेव्हा देखील पोखरण-१ अणुचाचणीनंतर, अमेरिकेने भारताला अणुइंधन पुरवठा, तांत्रिक सहकार्य आणि आर्थिक मदत यावर निर्बंध लादले होते.
१९९८ मध्ये जेव्हा भारताने पोखरणमध्ये अणुशस्त्रांची चाचणी केली तेव्हा अमेरिकेने भारताला त्रास दिला. दुसऱ्या महायुद्धात जपानवर दोन अणुबॉम्ब टाकणाऱ्या अमेरिकेला भारताच्या अणुबॉम्ब संपन्न होण्याचा त्रास होत होता. यासाठी १९९४ च्या शस्त्रास्त्र निर्यात नियंत्रण कायद्याचा वापर केला गेला. लष्करी विक्री आणि शस्त्रास्त्र विक्रीचे परवाने रद्द केले. नवीन कर्जे आणि क्रेडिट हमी थांबविण्यात आली होती. तसेच जागतिक बँकेकडून कर्जे थांबवण्यात आली होती. वाजपेयी सरकारने अमेरिकेपुढे झुकण्यास नकार दिला आणि भारत आज अण्वस्त्रशक्ती बनला. कुटनिती वापरली आणि चर्चेतून 1999 मध्ये निर्बंध उठविण्यास भाग पाडले गेले.
बांगलादेश युद्धावेळी देखील अमेरिकेने भारतावर हल्ला करण्यासाठी विमानवाहू युद्धनौका पाठविल्या होत्या. रशियाला हे समजताच रशियाच्या युद्धनौकांनी त्यांचा पाठलाग केला होता. या जगात भारताचा रशियाच हा असा देश आहे जो सर्व संकटांत पाठीशी उभा राहिला होता. आजही भारत रशियाकडून ते सांगतील त्या दराने युद्धसामुग्री खरेदी करतो. याचे मुख्य कारण म्हणजे रशियाने वेळोवेळी भारताला केलेली मदत हेच आहे.