अजित डोवाल आपल्या गावी पोहोचले अन् मातृभाषेत संवाद साधून सर्वांचे मन जिंकले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 05:35 PM2020-10-25T17:35:24+5:302020-10-25T17:46:37+5:30

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल शुक्रवारी दोन दिवसांच्या वैयक्तिक दौऱ्यासाठी उत्तराखंडला गेले होते.

आज ते दिल्लीला रवाना झाले. दरम्यान, उत्तराखंडच्या दौऱ्यात अजित डोवाल यांनी आपल्या गावी पौडीला जाऊन गावकऱ्यांशी बातचीत केली.

अजित डोवाल पत्नी अरुणा डोवाल यांच्यासोबत पौडीला पोहोचले. त्यावेळी त्यांनी आपल्या गढ़वाली भाषेत गावकऱ्यांशी संवाद साधला.

सर्वप्रथम ते सिद्धपीठ माँ ज्वाल्पा देवीची पूजा करण्यासाठी गेले. मंदिराच्या आवारात सुमारे ५० मिनिटे थांबले होते. यावेळी त्यांनी मंदिरातील पुजारी व ग्रामस्थांशी गढ़वाली भाषेत भाष्य केले.

गावात पोहोचल्यानंतर सुद्धा अजित डोवाल यांनी गढ़वालीमध्ये बोलून गावकऱ्यांची मने जिंकली. एवढ्या उच्च पदावर असूनही गाव व आपली भाषेबद्दल प्रेम असणे आणि ती न विसरणे, हे अजित डोवाल यांच्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे गावकऱ्यांनी सांगितले.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अजित डोवाल यांचा आत्तापर्यंतचा हा तिसरा वैयक्तिगत दौरा होता.

दरम्यान, आपल्या गावातील लोकांनी गप्पा मारताना अजित डोवाल यांनी गावात आपले घर बांधण्याची इच्छा व्यक्त केली.

या दौऱ्यात अजित डोवाल यांनी ऋषिकेशमधील परमार्थ निकेतन येथे यज्ञ हवनही केले आणि माता गंगेची आरती केली. अजित डोवाल आल्यानंतर संपूर्ण तीर्थक्षेत्रात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होते.

देहरादून, पौडी आणि टिहरी येथील पोलीस सतर्क राहिले होते. तसेच, प्रशासनातील लोकही व्यवस्था करण्यात व्यस्त होते.