Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:53 IST2025-06-12T15:49:14+5:302025-06-12T15:53:37+5:30

गुजरातच्या अहमदाबाद येथे मोठा विमान अपघात झाला आहे. एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान कोसळल्यानंतर परिसरात धूराचं साम्राज्य पसरलं. रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहचल्या. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेकऑफ घेतल्या काही मिनिटांनी हा अपघात घडला.
या विमानात १२ क्रू मेंबर्ससह २३० प्रवासी मिळून एकूण २४२ जण प्रवास करत होते. या विमानाने दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण घेतले त्यानंतर १ वाजून ४० मिनिटांनी विमान क्रॅश झाले. अहमदाबाद पोलीस कंट्रोल रूमला याची माहिती मिळाली. एअरपोर्टवरून टेकऑफ घेतल्यानंतर काही मिनिटांनी मेघानीनगर भागात हे विमान कोसळले.
या भीषण दुर्घटनेनंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने तातडीची बैठक बोलावली आहे. नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहमदाबादसाठी रवाना झालेत. या दुर्घटनेनंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी पोहचल्या आणि आग विझवण्याचं काम सुरू झाले.
या दुर्घटनेचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात घटनास्थळी काळा धूर आकाशात पसरला होता. रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहचली त्यांनी या दुर्घटनेतील जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. क्रॅश झालेले विमान ११ वर्ष जुने असल्याचे पुढे आले आहे.
ज्यावेळी या विमानाचा संपर्क तुटला तेव्हा हे विमान समुद्र सपाटीपासून ६२५ फूट उंचीवर होते. या विमानात २ पायलट आणि १० क्रू मेंबर्स होते. दिल्लीहून हे विमान अहमदाबादला पोहचले होते त्यानंतर तिथून लंडनसाठी रवाना होणार होते. या विमानात ५३ ब्रिटन नागरिक होते, ७ पोर्तुगाल आणि कॅनडाचा १ नागरीक प्रवास करत होता. तर १६९ भारतीय होते.
जेव्हा हे विमान क्रॅश झाले त्यामुळे इथल्या एका बिल्डिंगलाही आग लागली. ही इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. विमान पूर्णत: जळाले होते. त्यामुळे या दुर्घटनेत प्रचंड जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अधिकृतपणे मृतांचा आकडा अद्याप समोर आला नाही.
क्रॅश झालेले विमान कॅप्टन सुमीत सभरवाल उडवत होते. त्यांना ८२०० तास विमान उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांच्यासोबत असलेल्या सहपायलटला ११०० तास विमान उडवण्याचा अनुभव होता. या विमानाने रनवे २३ वरून उड्डाण घेतले होते. त्यानंतर २ मिनिटांनीच विमानतळ परिसरातील नागरी वस्तीत हे विमान खाली कोसळले.
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर चेअरमन एन चंद्रशेखरन म्हणाले की, अहमदाबादहून लंडनला जाणारं AI 171 विमान दुर्घटनाग्रस्त झाले त्यामुळे मी खूप दु:खी आहे. या दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबासोबत आमच्या संवेदना आहेत. घटनास्थळी इमरजेंसी टीम कार्यरत आहे. पीडित लोकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी आमचे प्राधान्य आहे असं त्यांनी सांगितले.
माहितीनुसार, या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही प्रवास करत होते. एअर इंडियाने दिलेल्या प्रवासी यादीत रुपाणी यांच्या नावाचा समावेश आहे. या दुर्घटनेतील जखमींसाठी ग्रीन कॉरिडोर व्यवस्था बनवण्याची आणि हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागरी हवाई उड्डाण मंत्र्यांशी संवाद साधून अपघाताची माहिती घेतली. नागरी उड्डाण मंत्री घटनास्थळी पोहचत आहेत. त्याशिवाय गृहमंत्री अमित शाह यांनीही रेस्क्यू टीम, एनडीआरएफ पथके घटनास्थळी पाठवले आहे. स्वत: शाह दुर्घटनास्थळी जात आहेत.