Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:38 IST2025-06-12T15:18:17+5:302025-06-12T15:38:27+5:30

Ahmedabad Plane Crash: गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. अहमदाबादमधील मेघानी नगर येथील निवासी भागात एअर इंडियाचे विमान कोसळले.

गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये एक मोठा विमानअपघात झालाय. अहमदाबादमधील मेघानी नगर येथील निवासी भागात एअर इंडियाचे विमान कोसळले. हा अपघात उड्डाणादरम्यान झाल्याचं सांगितलं जातंय.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे हे विमान बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर होते, हे विमान सुमारे ११ वर्षे जुने होते. अपघाताच्या वेळी विमानात २४२ लोक होते. विमानाने उड्डाण करताच, काही वेळातच त्याचे नियंत्रण सुटले आणि विमानतळ कॅम्पसला लागून असलेल्या एअर कस्टम कार्गो ऑफिसजवळील एका इमारतीवर कोसळले.

अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ अत्यंत भयानक आहेत. अपघातस्थळावरून उठणाऱ्या काळ्या धुराच्या मोठ्या लोटांनी संपूर्ण परिसर व्यापला आहे. आजूबाजूच्या लोकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण आहे.

अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या किती लोक जखमी झाले आहेत किंवा किती जणांना आपला जीव गमवावा लागला आहे हे स्पष्ट झालेले नाही.

विमानाच्या स्फोटामुळे आणि आगीमुळे इमारतीचेही बरेच नुकसान झाले आहे. सुरक्षा दल, एनडीआरएफ आणि विमानतळ प्राधिकरणाच्या टीम घटनास्थळी उपस्थित आहेत.

विमान उड्डाण करते पण ते वर जाण्यापूर्वीच विमान खाली येत असस्याचे फोटोमध्ये दिसत आहे.

या अपघाताला देशाच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ज्या ठिकाणी विमान कोसळले त्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.