८९३१ दिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रचला मोठा विक्रम, बनले भारतात दीर्घकाळ सरकार चालवणारे नेते
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 14:04 IST2026-03-22T14:00:44+5:302026-03-22T14:04:25+5:30
Narendra Modi News: गेल्या २५ वर्षांपासून देशाच्या राजकीय वर्तुळात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. नरेंद्र मोदी यांनी घटनात्मक पदावरील आपले ८ हजार ९३१ दिवस पूर्ण केले आहेत. याबरोबरच मुख्यमंत्रिपद आणि पंतप्रधानपदावरील कार्यकाळ मिळून नरेंद्र मोदी हे सर्वाधिक काळ सरकार चालवणारे नेते बनले आहेत.


याआधी हा विक्रम सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्या नावावर होता. त्यांनी सलग ८ हजार ९३० दिवस सरकारचं नेतृत्व केलं होतं. तसेच भारतातील कुठल्याही सरकारच्या प्रमुखाचा हा सर्वात मोठा कार्यकाळ होता.

पवन कुमार चामलिंग हे १९९४ ते २५ अशी सलग २५ वर्षे म्हणजेच सुमारे ८९३१ दिवस सिक्कीमचे मुख्यमंत्री होते. तसेच भारतीय राजकारणामध्ये ही अत्यंत असामान्य बाब होती. मात्र हा विक्रम आज नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कारकीर्दीतील ८९३१ वा दिवस पूर्ण करत मोडला आहे.

नरेंद्र मोदी यांचा हा कार्यकाळ दोन टप्प्यामध्ये विभागलेला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात २००१ ते २०१४ या काळात नरेंद्र मोदी यांनी गुजरातचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. तसेच गुजरातचं मुख्यमंत्रिपद भूषवत असतानाच मोदींची राष्ट्रीय नेते आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून चर्चा होऊ लागली होती.

पुढे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी हे भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. तसेच २०१४ पासून आतापर्यंत ते पंतप्रधानपदावर आहेत. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान असे दोन्ही कार्यकाळ जोडून मोदींनी आपल्या कारकिर्दीमधील ८ हजार ९३१ दिवस पूर्ण केले आहेत.

सर्वाधिक काळ सत्तापद सांभाळण्यासोबतच नरेंद्र मोदी यांनी आणखीही काही विक्रम केले आहेत. सर्वाधिक काळ गुजरातचं मुख्यमंत्रिपद सांभाळण्याचा विक्रम नरेंद्र मोदी यांच्या नावावर आहे. तसेच स्वातंत्र्योत्तर भारतात जन्मलेले नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. तसेच मोदींनी सलग ३ लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याचा विक्रमही मोदींनी केला आहे.

















