६० टक्के स्वदेशी, २२०० किमी वेग: एका 'तेजस' फायटर जेटची किंमत किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 17:41 IST2025-11-22T17:34:14+5:302025-11-22T17:41:16+5:30

दुबई एअर शोमध्ये भारताचे स्वदेशी बनावटीचे तेजस Mk1 लढाऊ विमान कोसळून विंग कमांडर नमन स्याल शहीद झाल्यामुळे, या महत्त्वाकांक्षी विमानाची किंमत आणि तांत्रिक वैशिष्ट्ये पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आली आहेत.

'तेजस' हे केवळ एक लढाऊ विमान नसून, ते 'आत्मनिर्भर भारत' अभियानाचे प्रतीक आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या'एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी' आणि 'हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड'यांनी हे हलके आणि बहुउद्देशीयलढाऊ विमान विकसित केले आहे.

तेजसची निर्मिती आधुनिक तंत्रज्ञान वापरून करण्यात आली आहे. त्याच्या हलक्या वजनामुळे आणि डेल्टा विंग डिझाईनमुळे ते अत्यंत चपळ आहे. या विमानामध्ये ६० टक्क्यांहून अधिक स्वदेशी तंत्रज्ञान आणि उपकरणे वापरली आहेत, ज्यामुळे ते स्वदेशी सामर्थ्याचे उत्तम उदाहरण ठरते.

तेजस विमानाची किंमत निश्चितपणे खूप मोठी आहे. काही महिन्यांपूर्वीच भारत सरकारने ९७ तेजस Mk-1A जेट्स खरेदी करण्यासाठी हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड सोबत ६२,३७० कोटी रुपयांचा मोठा करार केला आहे.

एका विमानाची सरासरी किंमत सुमारे ६८० कोटी रुपये आहे. ही किंमत केवळ विमानाचे उत्पादन मूल्य नाही, तर यात खर्च, वैमानिकांचे प्रशिक्षण, आवश्यक सुटे भाग, ग्राउंड सपोर्ट सिस्टम आणि ऑपरेशनल इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च देखील समाविष्ट असतो. यापूर्वी फेब्रुवारी २०२१ मध्ये, ८३ तेजस मार्क-१ए विमानांचा करार ४६,८९८ कोटी रुपयांमध्ये झाला होता.

विमान डेल्टा विंग डिझाईन आणि फ्लाई-बाय-वायर प्रणालीमुळे अत्यंत चपळ आहे. याच्या बांधणीत ४२% कार्बन फायबर, ४३% ॲल्युमिनियम धातूंचे मिश्रण आणि टायटॅनियमचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे त्याचे वजन कमी आहे.

तेजसमध्ये अमेरिकेचे जनरल इलेक्ट्रिक इंजिन वापरले जात असल्याने, त्याची किंमत वाढते. त्याची गती ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक असून ती ताशी २२०० किमी पर्यंत (Mach 1.8+) पोहोचू शकते.