एका झटक्यात ५० लाख मतदारांना करणार टार्गेट; मिशन २०२४ साठी भाजपाचा 'YB' प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 04:46 PM2024-01-25T16:46:38+5:302024-01-25T16:51:18+5:30

लोकसभा निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पहिल्यांदा मतदान करणारे मतदार आणि लाभार्थ्यांवर लक्ष केंद्रित करत आहे. नवमतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्कम समर्थक आहेत आणि त्याचा फायदा पक्षाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही होण्याची आशा पक्ष नेतृत्वाला आहे.

दुसरीकडे, केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना आणि त्याचे लाभार्थी यांच्यावरही पक्ष विशेष लक्ष केंद्रित करेल. राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर आता पंतप्रधान मोदीही या मिशनवर सक्रिय झाले आहेत. आज, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशभरातील प्रथमच मतदारांशी संवाद साधला. मिशन हॅट्रिकसाठी भाजपा कोणतीही कसर सोडत नाहीये.

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात गरीब, शेतकरी, महिला आणि तरुणांवर भर देण्याचं बोलले. आता पक्षानेही या तरुणांपर्यंत पोहोचण्याच्या योजनेवर काम सुरू केले आहे. 'फिर एक बार मोदी सरकार' या घोषणेने पक्ष तरुणांना आकर्षित करत आहे. आज पहिल्यांदाच या मतदारांशी संवाद साधत पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या तयारीचे संकेतही दिले.

१८-१९ वयोगटातील मतदारच सत्तेची चावी आहेत का? - लोकसभा निवडणुकीची घोषणा काही महिन्यांत होणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या १८-१९ वयोगटातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाने रणनीती सुरू केली आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये नवीन मतदारांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे.

नवीन मतदार सत्तेच्या चाव्या हातात देऊ शकतात आणि परतही घेऊ शकतात हे सर्वच पक्षांना माहीत आहे. अशा स्थितीत या मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा सक्रिय झाला आहे. महाराष्ट्रात एकूण ९.१२ कोटी मतदार आहे. त्यात १०.१८ लाख नवमतदार हे पहिल्यांदाच निवडणुकीत मतदान करणार आहेत.

बिहारमधील एकूण ७.६ कोटी मतदारांपैकी १८-१९ वर्षे वयोगटातील मतदारांची संख्या प्रचंड वाढली आहे. राज्यात या वयोगटातील लोकांची संख्या सुमारे ९.२५ लाखांनी वाढली आहे. आंध्र प्रदेशात नवीन मतदारांची संख्या ५.२५ लाखांनी वाढली आहे. राज्यात एकूण ४.०८ कोटी मतदार आहेत. तर कर्नाटकच्या नवीन मतदार यादीत १८-१९ वर्षे वयोगटातील मतदारांची संख्या १० लाख ३४ हजार ०१८ ने वाढली आहे. राज्यात एकूण ५.३७ कोटी मतदार आहेत.

या निवडणुकीत ५० लाख नवीन मतदार मोठा बदल घडवू शकतात. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांच्या निवडणुकीतही भाजपाला पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांचा पाठिंबा मिळाला. तरुणांवर लक्ष केंद्रित करून आपली व्होट बँक वाढवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ३७.३६ टक्के मतं मिळाली होती, यावेळी पक्षाला ही मतसंख्या ५० टक्क्यांपर्यंत वाढवायची आहे. त्यासाठी तरुणांची साथ आवश्यक आहे. त्यासाठी यंग ब्रिगेडवर(YB) पक्षाने फोकस ठेवला आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांवर भाजपा लक्ष ठेवून आहे.

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयात लाभार्थ्यांचा मोठा वाटा होता. जन धन योजना, शौचालय योजना, उज्ज्वला योजना, पीएम आवास योजना आणि जल जीवन मिशन या मोदी सरकारच्या यशस्वी योजना आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी या योजनांबद्दल मोठ्या प्रमाणावर बोलतात. लाभार्थी ही पक्षाची मोठी व्होट बँक बनली आहे. पक्ष आता त्यात आणखी वाढ करत आहे.

पीएम मोदींनी यूपीमधील बुलंदशहरमधून गावापर्यंत पोहचण्यासाठी नवीन मोहीम सुरू केली आहे. 'गाव चलो अभियाना'च्या माध्यमातून ग्रामीण भागातील मतदारांना पक्षासोबत जोडण्याचा हा संकल्प आहे. २०२४ च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पक्ष गाव चलो मोहिमेवर विशेष भर देत आहे. या मोहिमेमुळे गावोगावी मतदारांनाही पक्षाच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.