संयुक्त राष्ट्रात १० दिवसांत भारताविरोधात ३ प्रस्ताव; रशियानं 'व्हेटो' वापरत निभावली मैत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 08:35 IST2025-12-04T08:23:59+5:302025-12-04T08:35:48+5:30

"हिवाळ्यात रशियामधील तापमान कितीही कमी झाले तरी, भारत-रशिया मैत्रीचे तापमान नेहमीच 'अधिक' राहिले आहे, ते उबदार आहे असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. जेव्हा पंतप्रधान मोदी मागील वर्षी रशियाला गेले होते तेव्हा त्यांनी भारत-सोव्हिएत मैत्रीच्या भूतकाळातील सुवर्ण आठवणींना उजाळा दिला. भारत रशिया यांची मैत्री कित्येक दशकापासून सुरू आहे.

आज रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्याने ही मैत्री आणि विश्वासाचं नाते आणखी मजबूत होणार आहे. भारत सोव्हिएत मैत्रीची ऐतिहासिक कारणे आहेत. कोल्ड वॉरचा काळ, जग २ गटात विभागले होते. १९७१ मध्ये बांगलादेश मुक्ती संग्रामावेळी अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलियासारखे काही देश ज्यांनी पूर्व पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचारांकडे डोळेझाक केली होती.

या देशांना युद्धबंदी आणि सैन्य मागे घेण्याची इच्छा होती. भारताने जेव्हा या युद्धात प्रवेश केला तेव्हा या देशांनी शांततेच्या नावाखाली संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताविरोधात एका पाठोपाठ एक प्रस्ताव आणले होते. ४ डिसेंबर १९७१ ते १३ डिसेंबर १९७१ या कालावधीत संयुक्त राष्ट्रात भारताविरोधात ३ प्रस्ताव मांडले गेले. परंतु सोव्हिएत रशियाने प्रत्येक प्रस्तावावर वीटो पॉवरचा वापर केला.

हे खूप रंजक आहे की आजपासून ५४ वर्षापूर्वी UNSC मध्ये रशियाने भारत पाकिस्तान युद्धावर अमेरिकेकडून मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर वीटोचा वापर करत भारतासोबतची मैत्री दाखवून दिली. या युद्धाचा निकाल १६ डिसेंबरला पाकिस्तानचं सरेंडर आणि बांगलादेशाची निर्मिती असा लागला. आज ५४ वर्षांनी पुन्हा एकदा रशियाचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर येत आहेत.

जर संयुक्त राष्ट्रात हे प्रस्ताव मंजूर झाले असते तर दक्षिण आशियातील नकाशा वेगळा असता. कदाचित पाकिस्तानचे २ तुकडे झाले नसते. हा प्रस्ताव मंजूर झाला असता तर भारताला युद्धविराम करावा लागला असता आणि पूर्व पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्याची लढाई दडपण्याचं काम करण्याचं पाकिस्तानचे षडयंत्र यशस्वी ठरले असते. परराष्ट्र धोरणाच्या या कुटनितीत इंदिरा गांधी यांनी कसं जगातील शक्तींचा सामना केला हे जाणून घेऊ.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारत आणि रशियामध्ये मैत्रीची एक नैसर्गिक भावना निर्माण झाली. सोव्हिएत रशियाच्या कम्युनिस्ट प्रयोगाने नेहरू प्रभावित झाले. पंडित नेहरूंनी सोव्हिएत मॉडेलला भारतासारख्या विकसनशील देशाला जलद आधुनिकीकरण करण्यास मदत करणारा मार्ग म्हणून पाहिले. विशेषतः पंचवार्षिक योजनांद्वारे...स्वातंत्र्यानंतर लगेच पाकिस्तान अमेरिकेच्या मांडीवर जाऊन बसले. त्यावर भारताने अलिप्ततेचे धोरण स्वीकारले.

या काळात सोव्हिएत रशियाने भारताला एक स्वावलंबी राष्ट्र म्हणून उदयास येण्यास मदत केली. यूएसएसआरने भिलाई आणि बोकारो स्टील प्लांट स्थापन करण्यास मदत केली. त्यामुळे भारतात औद्योगिकरणाला चालना मिळाली. इतकेच नाहीतर १९६५ आणि १९७१ साली पाकिस्तानसोबत लढाईत रशियाने भारताची मैत्री म्हणून मदतही केली. त्यामुळे भारत आणि रशिया यांच्यातील संबंध घट्ट झाले.

२५ मार्च १९७१ च्या रात्री पाकिस्तानी सैन्याकडून ढाका येथे नरसंहार सुरू झाला. त्यांनी ऑपरेशन सर्चलाइट सुरू करत पूर्व पाकिस्तानात हिंसाचार घडवला. हजारो लोक मारले गेले. महाविद्यालयांवर हल्ले झाले. चळवळीतील लोकांना शोधून शोधून मारले. लाखो लोक जीव वाचवून भारतात आले. १० महिन्यात १ कोटीहून अधिक शरणार्थी भारतात आले.

या शरणार्थीमुळे भारतावर आर्थिक आणि सामाजिक बोझा पडला. इंदिरा गांधी यांनी जगभर फिरून ही समस्या पाकिस्तानची असून त्यांनीच त्यावर तोडगा काढावा असं म्हटलं परंतु कुठल्याही देशाने पाकिस्तानवर दबाव टाकला नाही. त्यातच भारताने मुक्ती वाहिनीला गुप्तपणे प्रशिक्षण, शस्त्रे आणि आश्रय दिला. इंदिरा गांधी यांची कुटनिती आणि धोरणात्मक निर्णय कामी आले.

३ डिसेंबरला बांगलादेशातील लढाईला निर्णायक वळण लागले. याच दिवशी पाकिस्तानने भारताच्या ११ एअरबेसवर हल्ला केला. तेव्हा भारत सज्ज होता. भारतीय सैन्याने तिन्ही बाजूने पूर्व पाकिस्तानात शिरकाव केला. त्यानंतर संयुक्त राष्ट्रात भारताविरोधात ३ प्रस्ताव आले. पहिला प्रस्ताव ४ डिसेंबरला, दुसरा ५ डिसेंबर आणि तिसरा प्रस्ताव १३ डिसेंबरला आणला. रशियाने भारताची साथ देत वीटो पॉवरचा वापर करत प्रस्ताव पुढे ढकलले. त्यानंतर १६ डिसेंबरला पाकिस्तानी सैन्याने सरेंडर केले, तेव्हा भारत पाकिस्तान युद्ध थांबले आणि बांगलादेश निर्माण झाला.

















