Coronavirus: ही १० कारणं वाचा; मग कमी होईल तुमचीही चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 12:39 PM2020-03-12T12:39:24+5:302020-03-12T13:08:06+5:30

सध्या जगभरात कोरोनाचं थैमान पाहायला मिळतंय. शंभरहून अधिक देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोनामुळे चार हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाल्यानं जागतिक आरोग्य संघटनेनं महारोगराई घोषित केली आहे. केंद्र सरकारनं १५ एप्रिलपर्यंत परदेशी पर्यटकांचे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सर्वत्र कोरोनाची दहशत पाहायला मिळतेय. मात्र कोरोनाला घाबरण्याची फारशी गरज नाही.

कोरोना म्हणजे नेमका काय, याची संपूर्ण माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. एड्सचा पहिला रुग्ण जून १९८१ मध्ये आढळून आला. मात्र त्या व्यक्तीला एड्स झालाय, यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी दोन वर्षे जावी लागली. कोरोनाबद्दल मात्र तसं झालेलं नाही. ३१ डिसेंबर २०१९ ला चीनमधल्या एका व्यक्तीमध्ये वेगळ्याच आजाराची लक्षणं आढळून आली. त्यानंतर अवघ्या सात दिवसांत त्या रुग्णाला कोरोना झाल्याचं निदान करण्यात आलं. त्यामुळे कोरोना नेमका काय आहे, त्याची लक्षणं काय याची नेमकी माहिती लगेच उपलब्ध झाली.

कोरोनाची पडताळणी कशी करायची, याचं तंत्र आपल्याकडे उपलब्ध आहे. १३ जानेवारीपासूनच कोरोनाची तपासणी होऊ लागलीय. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण सापडणं सोपं झालंय.

कोरोना चीनच्या वुहानमधून जगभरात पसरला. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये कोरोनानं चीनमध्ये हाहाकार माजवला. मात्र आता वुहानसोबतच चीनच्या इतरही भागांमधली परिस्थिती वेगानं सुधारतेय. कोरोनाची लागण झालेल्यांचं प्रमाण दिवसागणिक कमी होतंय.

कोरोनाची बाधा झालेल्या एकूण रुग्णांपैकी ८१ टक्के रुग्णांमध्ये दिसणारी लक्षणं अतिशय सौम्य आहेत. याशिवाय कोरोनाचा मृत्यूदर अवघा २ टक्के इतका आहे.

कोरोनाची बाधा झाल्यानंतर तातडीनं उपचार घेतल्यास फरक पडतो. कोरोना लवकर बरा होतो. गेल्या महिन्याभरातल्या आकडेवारीवरुन ही बाब स्पष्ट झालीय.

वीस वर्षांखालील केवळ ३ टक्के व्यक्तींना कोराना झालाय. त्यामुळे लहान मुलांना कोरोना होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये चाळीसपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींचं प्रमाण केवळ ०.२ टक्के इतकं आहे.

इथेनॉल, हायड्रोजन पॅराक्साईड, सोडियम हायपोक्लोराईट यांच्या द्रावणाच्या मदतीनं कोरोनाचा विषाणू अवघ्या मिनिटभरात निष्प्रभ करता येतो. ठराविक वेळानंतर साबणानं हात धुतल्यास कोरोनाचा संसर्ग टाळता येतो.

तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे कोरोनावर गेल्या महिन्याभरात खूप संशोधन झालंय. या कालावधीत जवळपास १६४ लेख प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय त्याचे उपचार, लस यासारख्या वैद्यकीय बाबींवर मोठ्या प्रमाणात संशोधन झालंय. कोरोनाशी संबंधित झालेलं संशोधन जगभरात पाठवलं जातंय. त्यामुळे सगळ्या संशोधकांना त्याचा उपयोग होतोय.

कोरोनावर लस शोधण्यासाठी आठ प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे लवकरच कोरोनावरील लस तयार होऊ शकते. ऑस्ट्रेलियातलं क्वीन्सलँड विद्यापीठ मोलेक्युलर क्लॅप तंत्राच्या माध्यमातून संशोधन करतंय. या माध्यमातून लस शोधण्यात आल्यास तिचं विक्रमी वेळेत उपलब्ध करता येऊ शकतं.

कोरोनाला रोखण्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या विविध औषधांच्या चाचणी सुरू आहेत. कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू असतानाच कोणालाही कोरोना होऊ नये, अशी लस तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.