Ashok Kharat Case : ऑफिसबॉयचे कारस्थान, महिलांच्या अब्रूचा कोट्यवधीत सौदा; अशोक खरातचे व्हिडीओ कसे आले समोर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 11:59 IST2026-03-20T11:36:53+5:302026-03-20T11:59:06+5:30

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत ५८ व्हिडीओ मिळाल्याचे समोर आले आहे. हे व्हिडीओ कसे समोर आले याची माहितीही समोर आली आहे.

Ashok Kharat Case : नाशिक येथील अशोक खरात याला दोन दिवसापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात पोलिसांना आता पुरावे सापडले आहेत, तसेच काही आक्षेपार्ह व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आले आहेत. हे व्हिडीओ कसे लिक झाले याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अशोक खरात याच्या ऑफिसमधील ऑफिसबॉय मास्टरमाईंड असल्याचे समोर आले.

व्हिडीओ लिक करण्यामधील सूत्रधार हा ऑफिसबॉय नीरज जाधव असल्याचे समोर आले. अशोक खरातने अनेक महिलांचे केबीनमध्येच शोषण केले, याचे सीसीटीव्ही फुटेज लिक करुन ५८ व्हिडीओ विकण्याचा प्लान केला होता.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. काल अनेक पुरावे ताब्यात घेतले आहेत. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथील या कार्यालयात अशोक खरातने अनेक महिलांवर केलेल्या अत्याचाराचे व्हिडीओ, मॉर्फ व्हिडीओ, फोटो व पुरावे सीसीटीव्हीच्या माध्यमातून साठवून ठेवले होते.

खरातच्या ऑफिसमधील ऑफिसबॉयचे काम करणारा त्याचा विश्वासू नीरज जाधव याने डिसेंबर २०२५ साली खरातच्या नकळत कार्यालयातून या ५८ महिलांवरील अत्याचाराचे फुटेज चोरले.

नीरज याला पैसा जास्त मिळवायचा होता. त्याने या व्हिडीओंच्या जोरावर खरातलाच ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे.

नीरज आणि त्याच्या साथीदारांनी या क्लिप्सच्या बदल्यात खरातकडे ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. मात्र, खरातने या मागणीला दाद न देता पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करीत थेट वावी पोलिसांत फिर्याद नोंदविली होती.

खरातने फिर्याद नोंदवल्यामुळे नीरज थेट पीडित महिलांकडे गेला. नीरजने आणि त्याच्या साथीदाराने एका २४ वर्षीय तरुणीच्या व्हॉट्सअपवर व्हिडीओ पाठवून धमकावले.

पीडिता मंदिरात दर्शन घेत असताना नीरजसह संशयिताने तिला गाठून व्हिडीओ दाखविले. ती घाबरली व तिने ही बाब खरातला सांगितली. पण खरातने स्वतःला वाचवण्यासाठी तिलाच पोलिसात जाण्यास सांगितले. खरातकडून पैसे मिळण्याची आशा मावळताच नीरजने सिडकोतील २८ वर्षीय विवाहितेचा व्हिडीओ तिच्या मेहुण्याला पाठविला. त्यांचा हाच डाव अंगलट आला. त्या महिलेने पोलिसात खरात विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी आधी अशोक खरात याच्या निवासस्थानासह ऑफिस, फार्म हाऊसची झाडाझडती घेतली. आता एसआयटीने तांत्रिक पुराव्याची तपासणी सुरू केली असून डिजिटल आणि फॉरेन्सिकच्या आधारे तपास करण्यात येत आहे. अशोक खरात याच्या अनेक ठिकाणी मालमत्ता सापडल्या आहेत, त्याने पाथर्डी गवळाणे, सिन्नर आणि शिर्डी, ओझर परिसरात कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे.