नाशकात बस आणि रिक्षा भीषण अपघातानंतर बस विहिरीत कोसळून 21 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 09:50 PM2020-01-28T21:50:53+5:302020-01-28T22:49:45+5:30

नाशकातल्या देवळा-सौंदाणे रस्त्यावर आज दुपारी एसटी बस आणि अ‍ॅपेरिक्षाची भीषण अपघात झाला आहे.

बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाल्यानंतर दोन्ही वाहनं सुमारे 70 फूट खोल विहिरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे.

कळवण डेपोची एसटी बस धुळ्याहून कळवणकडे निघाली होती. देवळा-सौंदाणे रस्त्यावर मेशी फाट्यालगत देवळ्याहून मालेगावकडे जाणाऱ्या रिक्षाला तिने धडक दिली.

अपघाताचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. नागरिकांचीही येथे मोठी गर्दी उसळली आहे.

दोन्ही वाहनांच्या चालकांना वेग नियंत्रणात अपयश आल्यानं ही दुर्घटना घडली. या धडकेनंतर बसनं रिक्षाला फरफटत नेलं.

यानंतर दोन्ही वाहनं विहिरीत पडली. विहिरीत रिक्षावर बस पडल्यानं रिक्षामधील सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समजतं.

याशिवाय बसमधील काही प्रवाशांवरदेखील काळानं घाला घातला आहे. यामध्ये चालकाचादेखील समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच जिल्हा शल्य चिकित्सक तातडीनं घटनास्थळी रवाना झाले. नाशिकहून जिल्हा रुग्णालयाच्या पाच गाड्या रवाना करण्यात आल्या.

विहिरीत पडलेली बस काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे. मात्र अद्याप दोन जण बेपत्ता आहेत. सध्या शोधकार्य थांबवण्यात आलं आहे.

एसटी बसचा टायर फुटल्यानं हा अपघात झाल्याची चर्चा आहे. मात्र एसटी प्रशासनाकडून याबद्दलची माहिती देण्यात येईल, असं घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

टॅग्स :नाशिकNashik