"हा पराभव वेदनादायक, पण..." निर्मला नवलेंची पराभवानंतर प्रतिक्रिया; चाहत्यांना दिला 'हा' शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:03 IST2026-02-10T15:44:45+5:302026-02-10T16:03:00+5:30

सोशल मीडियावर आपल्या खास स्टाईलने आणि रोखठोक भाषणांनी लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या निर्मला नवले यांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात मात्र पराभवाचा धक्का बसला आहे.

पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या निर्मला नवले यांचा शिरूर पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभव झाला. रिल्सच्या दुनियेत 'किंगमेकर' ठरणाऱ्या निर्मला यांची जादू मतपेटीतून चालली नसल्याचे या निकालाने स्पष्ट झाले आहे.

आयटी इंजिनिअर असलेल्या निर्मला नवले या त्यांच्या उच्चशिक्षित आणि ग्लॅमरस सरपंचकीमुळे चर्चेत आल्या होत्या. इन्स्टाग्रामवर त्यांचे ५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांची 'रेंज रोव्हर' खरेदी असो किंवा राजकीय भाषणे, त्यांचे प्रत्येक रील व्हायरल व्हायचे. मात्र, भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी त्यांचा पराभव करत विजय संपादन केला.

या निकालात मतांच्या आकड्यांबाबत भिन्न माहिती समोर येत असली, तरी निर्मला नवलेंनी स्वतः हा पराभव स्वीकारला असून तो त्यांच्यासाठी वेदनादायक असल्याचे म्हटले आहे. अजितदादांच्या निधनानंतर पुण्यात राष्ट्रवादीला काही ठिकाणी सहानुभूती मिळाली असली, तरी शिरूरच्या या गणात भाजपने बाजी मारली.

निकालानंतर निर्मला नवले यांनी इन्स्टाग्रामवर प्रतिक्रिया दिली. माझ्या नेतृत्वावर निस्वार्थपणे जीवापाड प्रेम करणाऱ्या, आणि माझ्या सुख-दुःखात सदैव प्रामाणिकपणे माझ्यासोबत उभे राहणाऱ्या मी निवडून येण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून खूप-खूप धन्यवाद. आपण सर्वांनी तुमची निर्मला पंचायत समितीवर जाण्यासाठी मागील दोन महिने जे अथक परिश्रम घेतले, असं निर्मला नवले म्हणाल्या.

"हा ३२९ मतांनी झालेला पराभव अनपेक्षित आहे आणि वेदनादायकही तो मी मान्य करते. पण या पराभवापेक्षा तुमचं प्रेम, तुमचा विश्वास आणि तुमची निष्ठा माझ्यासाठी खूप मोठा विजय आहे. तुमच्या या साथीनं मला पुन्हा उभं राहण्याची, नव्या जिद्दीनं पुढे जाण्याची ताकद दिली आहे. ही लढाई इथे थांबत नाही. तुमच्यासोबत चालायचा हा प्रवास आजही सुरूच आहे," असेही नवले म्हणाल्या.

पुणे जिल्ह्यात अजित पवार यांच्या निधनानंतर ही पहिलीच महत्त्वाची निवडणूक होती. जिल्ह्यात प्रचाराच्या मोठ्या सभा झाल्या नाहीत, तरीही राष्ट्रवादीने अनेक जागांवर वर्चस्व टिकवले. मात्र, सर्वाधिक चर्चेत असलेल्या निर्मला नवलेंचा पराभव हा या निवडणुकीतील मोठा 'अपसेट' मानला जात आहे.