“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:59 IST2025-11-13T13:51:10+5:302025-11-13T13:59:57+5:30

Indurikar Maharaj News: माझ्यापर्यंत ठीक होते, माझ्या घरादारापर्यंत जायला नको होते. तुम्हालाही लेकी आहेत. तुमच्या मुलीच्या कपड्यांवर एखाद्याने कमेंट केली, तर तुम्हाला काय वाटेल? अशी विचारणा इंदुरीकर महाराजांनी केली आहे.

Indurikar Maharaj News: समाज प्रबोधनकार, कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे कायम आपल्या भन्नाट कीर्तन आणि विनोदी शैलीसाठी चर्चेत असतात. समाजातील विविध विषयांवर जनजागृती करणारे इंदुरीकर महाराज यांची कीर्तने नेहमीच लोकांना विचार करायला लावतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या साखरपुड्यामुळे इंदुरीकर महाराज चांगलेच चर्चेत आहेत.

Indurikar Maharaj Video Viral On Social Media: इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्याचे व्हिडिओ, फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. राजेशाही थाटात मुलीची आणि जावयाची रथावरून मिरवणूक, पाहुण्यांच्या उपस्थितीने गच्च भरलेले कार्यालय, वारकरी वेशात टाळकरी, बायकांनी धरलेला फेर, राजकीय पुढाऱ्यांची विशेष उपस्थिती चर्चेचा विषय ठरला.

इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा साहिल चिलाप या बांधकाम व्यावसायिकासोबत पार पडला. परंतु, यानंतर इंदुरीकर महाराजांना सोशल मीडियावरून ट्रोल केले जात आहे. या सोशल मीडियावरील ट्रोलर्सना इंदुरीकर महाराजांची चोख उत्तर दिले. परंतु, यावेळी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलून दाखवले.

इंदुरीकर महाराजांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओत मुलीच्या साखरपुड्यानंतर होणाऱ्या ट्रोलिंगबाबत इंदुरीकर महाराजांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इंदुरीकर महाराज म्हणतात की, आम्ही किती कष्ट केली लोक याचा विचार करत नाहीत, आम्ही आमचा संसार किती कष्टातून मोठा केला याचा विचार लोक करत नाहीत, आमची पोरं लहान असताना आठ-आठ दिवस माझी त्यांच्याशी गाठ नव्हती.

आता लोक इतके खाली गेलेत की, माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे आहेत, यावरुन लोकांचे कमेंट्स आहेत. याच्यापेक्षा वाईट काय असेल? आता चार दिवसांपासून माझ्या मुलीच्या अंगावरील कपड्यांवर लोकांनी बातम्या तयार केल्या, पण तिच्या बापाला. मला तुम्ही काही बोला. माझा पिंड गेला. माझ्या मुलाचा आणि मुलीचा यात काय दोष आहे. पण या कॅमेरावाल्यांनी आठ दिवसात माझे जगणे मुश्किल करून टाकले आहे.

मला एक सांगा. मुलगी तुम्हालाही आहे. तुमच्या मुलीच्या कपड्यांवर एखाद्याने कमेंट केली, तर तुम्हाला काय वाटेल? आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे नवरदेवाकडचे घेतात की मुलीकडचे घेतात? मग कपडे त्यांनी आणले असतील की म्या घेतले असतील? एवढी तरी क्लिप टाकणाऱ्यांना लाज पाहिजे ना. माणूस नालायक असावा पण किती?

त्याच्यामुळे आता मी कंटाळलो. जवळजवळ मी दोन-तीन दिवसात टाकणार आहे एक क्लिप. थांबून घेणार आहे आता. बास झाली ३१ वर्ष. लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळे चांगलेच केले, आयुष्यात चांगले पण त्याचे फळ. माझ्यापर्यंत ठीक होते, माझ्या घरादारापर्यंत जायला नको होते. मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला.

मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे. मी अजून आहे ना. पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही. आणि ही अक्कल इंदुरीकरलाच आली पाहिजे. त्याने कीर्तन बंदच केले पाहिजे.

खरे की खोटे? तुम्ही काहीच बोलत नाही. हे त्याने बंद केले पाहिजे. त्याला लाज वाटली पाहिजे की, आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदुरीकरने फेटा ठेवून द्यावा. त्याचे त्याने चांगले जगावे. आम्ही दोन तीन दिवसापासून विचार करत आहोत, दोन तीन दिवसात मी घेणारे निर्णय. पण मजा नाही राहिली त्याच्यात आता, या शब्दांत इंदुरीकर महाराजांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या.

दरम्यान, साहिल चिलाप हे मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत. ते मुळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील असून, उच्च शिक्षित आहेत. गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती आहे आणि शहरात त्यांनी स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभा केला आहे.

इंदुरीकर महाराजांच्या या साखरपुड्याच्या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबावर चाहत्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. महाराजांच्या शिकवणीप्रमाणेच त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षणही लोकांना प्रेरणा देणारे ठरत आहेत.

इंदुरीकर महाराज नेहमी आपल्या कीर्तनातून साधेपणाचे महत्त्व सांगतात, पण या वेळी त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या कुटुंबातील आनंदाचा क्षण पाहायला मिळाला. लग्न साध्या पद्धतीने करा, असा संदेश देखील इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून देत असतात. परंतु, साखरपुड्याचा थाटमाट पाहून लोकांनी इंदुरीकर महाराजांना ट्रोल केले.