खुलासा! पहाटेचं सरकार कोसळल्यानंतर अजित पवार-देवेंद्र फडणवीस पुन्हा कधी भेटले?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 05:07 PM2023-04-13T17:07:54+5:302023-04-13T17:12:15+5:30

अलीकडे राजकीय वर्तुळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल विविध चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार भाजपासोबत जाणार असा दावा समाजसेविका अंजली दमानिया यांनी ट्विट करून केला. त्यानंतर प्रामुख्याने माध्यमात याची चर्चा सुरू झाली.

अजित पवार नॉट रिचेबलपासून अनेक बातम्या सध्या माध्यमांमध्ये झळकत आहेत. खुद्द संजय राऊत यांनीही जो प्रयोग शिंदेंसोबत झाला तसाच सध्या राष्ट्रवादीबाबतही सुरू आहे असं सांगितले आहे. त्यामुळे दाव्याला राजकीय पुष्टीही मिळत आहे.

अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले संबंध आहेत. त्यामुळे भविष्यात काही होईल सांगता येत नाही असं म्हटलं जात आहे. परंतु राज्यात २०१९ च्या निवडणुकीनंतर जो पहाटेचा शपथविधी सोहळा झाला. त्यानंतर अजित पवारांसोबत भेट कधी झाली याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ७२ तासांचे सरकार गेल्यानंतर अजित पवार इतके बचावात्मक स्थितीत होते. ते मला भेटायचेसुद्धा नाहीत. आमची भेट कोविडच्या निमित्ताने २ बैठकापुरती झाली. त्यानंतर एकदाही आमची भेट झाली नाही.

लोकांच्या मनात इतके संभ्रम तयार होतात. अजितदादा पुण्याच्या कार्यक्रमातून निघून गेले. त्याच दिवशी माझा फाईल्स डे होता, मी कुठलेही कार्यक्रम करत नाही. फाईल्स क्लिअर करण्यासाठी ठेवतो. त्यावेळी माझी आणि अजित पवारांची भेट नागपूरात झाली अशी बातमी आली. मी इथं बंगल्यावर ते कुठे माहिती नाहीत तरीही चर्चा झाली.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार भाजपासोबत येऊ शकतात अशी चर्चा आहे त्यावर फडणवीस म्हणाले की, आमदार संपर्कात नेहमीच असतात. संबंधामुळे अनेकजण आपल्यासोबत येतात. संपर्कात अनेक पण किती लोक येतील हे आज सांगता येणार नाही असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत निवडणुकीच्या तोंडावर कोण येतील हे दिसेल. काही मतदारसंघ असे असतात त्याठिकाणी प्रयत्न करूनही जिंकता येत नाही. लोकांचा विश्वास असणारे नेते आपल्यासोबत आले तर ते कोणाला नको असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर सरकारची बहुमत चाचणी झाली नाही. त्यामुळे ते पुन्हा सीएम बनणे शक्यच नाही. आमची भूमिका ठाम आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल योग्यपद्धतीने येईल. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या मुख्यमंत्री काळातच आम्ही निवडणुकीला सामोरे जावू असंही फडणवीस म्हणाले.

अजित पवार भाजपात जाणार यावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यात सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बातम्या कुठून येतात माहिती नाही. मी गॉसिपमध्ये फारसा वेळ घालवत नाही. माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत असं त्यांनी सांगितले.

राज्यात २०१९ च्या निवडणुकीनंतर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात पहाटे शपथविधी सोहळा आटोपला होता. त्यानंतर अवघ्या ७२ तासांत अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत परतले. मात्र गेल्या काही दिवसांपासून अजित पवार पुन्हा भाजपासोबत जाणार अशीच चर्चा सुरू झाली आहे.