१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 15:00 IST2025-08-11T14:49:37+5:302025-08-11T15:00:21+5:30

Vande Bharat Express Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ नव्या वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ केला. यानंतर संपूर्ण देशभरात चालवल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची संख्या १५० झाली आहे.

Vande Bharat Express Train: नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवत मार्गस्थ केले. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी प्रतीक्षित असलेली नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन अखेर सुरू झाली. या ट्रेनसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू ते बेळगाव आणि श्री माता वैष्णो देवी कटरा ते अमृतसर या दोन वंदे भारतचे लोकार्पणही केले.

आरामदायी आणि जलद प्रवासाची अनुभूती देणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची महाराष्ट्रातील विशेष रेल्वेंगाड्यांची संख्या नागपूर-पुणे या नव्या गाडीच्या समावेशाने २४ वर पोहोचली आहे. या तीन वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची भर पडल्यानंनतर देशात १५० वंदे भारत कार्यरत झाल्या आहेत. अद्यापही वंदे भारत ट्रेनने प्रवास करण्याची क्रेझ देशभरात कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

गतवर्षी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनने ३ कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. यामुळे रेल्वेच्या तिजोरीत तब्बल ७५ हजार कोटींहून अधिकचे उत्पन्न जमा झाले. वंदे भारत ट्रेनकडे प्रवासी मोठ्या संख्येने आकर्षित होत असल्याकडे रेल्वे मंत्रालयाकडून लक्ष वेधले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अजनी (नागपूर)-पुणे वंदे भारत आणि अन्य राज्यातील दोन अशा एकूण तीन वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ झाला.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील वंदे भारत रेल्वेची सद्यस्थिती मांडली होती. ३१ जुलै २०२५ च्या स्थितीनुसार विद्युतीकरण असणाऱ्या मोठ्या मार्गिकेवर १४४ वंदे भारत एक्स्प्रेस कार्यरत आहेत. रेल्वेचे विद्युतीकरण जाळे राज्याच्या सीमा ओलांडून पसरलेले असल्याने ते लक्षात घेऊन राज्याच्या सीमा ओलांडून रेल्वेगाड्या सुरू केल्या जातात.

मूळ आरंभ आणि अखेरचा थांबा या आधारावर महाराष्ट्रात २२ (अप-डाऊन मार्गासह) वंदे भारत रेल्वे विविध स्थानकांची गरज पूर्ण करीत असल्याचे रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे. यात आता नागपूर-पुणे वंदे भारत समाविष्ट होईल.

२०२४-२५ या वर्षात वंदे भारत एक्स्प्रेसमधून तीन कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. तर २०२५-२६ (जून २०२५ पर्यंत) वंदे भारतमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या ९३ लाख इतकी आहे. गतवर्षी १०२.०१ टक्के असणारी प्रवासी संख्या चालू वर्षात १०५.०३ टक्के आहे.

वंदे भारत एक्स्प्रेसचे उत्पन्न करोना काळात म्हणजे २०२०-२१ मध्ये १५ हजार २४८ इतके होते. पुढील काळात त्यात उत्तरोत्तर वाढ झाली. २०२४-२५ या वर्षात रेल्वेला वंदे भारतमधून ७५ हजार ३६८ कोटींचे उत्पन्न मिळाल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.

नागपूर-सिंकदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस, हुबळी-पुणे, कोल्हापूर-पुणे, जालना-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, बिलासपूर-नागपूर, मुंबई सेंट्रल-गांधीनगर, इंदूर-नागपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव, मुंबई सेंट्रल-अहमदाबाद या वंदे भारत ट्रेन कार्यरत आहेत.

नागपूर-पुणे या नव्या वंदे भारत एक्स्प्रेसने ही संख्या २४ वर पोहोचली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून काही मार्गांवरील ‘वंदे भारत’ ट्रेनच्या डब्यांची संख्याही वाढवण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. मुंबईहून नांदेड, सोलापूर या दोन्ही 'वंदे भारत' २० कोचच्या करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याची म्हटले जात आहे.

दुसरीकडे, मुंबई-मडगाव 'वंदे भारत'चे आरक्षण १०० टक्क्यांहून अधिक असल्याने प्रवासी, संघटना आणि कोकणातील लोकप्रतिनिधींनी या गाडीचे डबे वाढवण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे लावून धरली होती. परंतु, वाढीव कोचच्या मडगाव 'वंदे भारत' मधून प्रवास करण्यासाठी कोकणवासीयांना मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मध्य आणि कोकण रेल्वेकडे २० कोचच्या 'वंदे भारत'च्या देखभालीची सुविधा नाही. २० कोचच्या 'वंदे भारत' ट्रेनची देखभाल करण्यासाठी वाडीबंदर येथे 'वंदे भारत' डेपो उभारण्यात येत आहे. हे काम पूर्ण होण्यास किमान एक वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे.

मुंबई-कोकण रेल्वे अंतर वेगाने पार करणाऱ्या अगदी मोजक्या मेल-एक्सप्रेस आहेत. 'वंदे भारत'चा प्रवास आरामदायी आणि सुखद आहे. या मार्गावर धावणाऱ्या मडगाव जनशताब्दी आणि मडगाव तेजस या रेल्वेगाड्यांना १६ डबे आहेत. केवळ मुंबई-मडगाव वंदे भारतला ८ डबे आहेत. डबे कमी असल्याने अल्पावधीतच या गाडीचे आरक्षण पूर्ण होते. यामुळे अन्य गाड्यांच्या तुलनेत 'वंदे भारत'ला प्रवाशांची मागणी अधिक आहे.