Maharashtra Politics: मविआ काळात ‘त्या’ प्रकल्पाचा प्रस्ताव नामंजूर; शिवसेनेला माहितीच नाही? आदित्य ठाकरेही अनभिज्ञ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 04:12 PM2022-09-27T16:12:54+5:302022-09-27T16:18:37+5:30

Maharashtra Politics: केंद्राने वर्षभरापूर्वीच नामंजूर केलेल्या प्रकल्पाबाबत आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींना माहिती नाही का, असा सवाल केला जात आहे.

Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याप्रकरणी महाविकास आघाडीकडून शिंदे-भाजपवर निशाणा साधला जात आहे. विशेषतः शिवसेना आणि आदित्य ठाकरेंकडून (Aaditay Thackeray) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजप आणि शिंदे गटाकडूनही आदित्य ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना जशास तसे उत्तर दिले जात आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासाठीची जागा दाखवावी, असे आव्हानही भाजपकडून देण्यात आले आहे. तसेच काही कागदपत्रांच्या आधारे भाजप तत्कालीन महाविकास आघाडी सरकार पलटवार करताना दिसत आहे.

यातच वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्कनंतर महाराष्ट्राने 'मेडिकल डिव्हाईस पार्क'चा प्रकल्प सुद्धा गमावला असल्याचा आरोप करत आदित्य ठाकरेंनी एक ट्विट केले आहे. मात्र 'मेडिकल डिव्हाईस पार्क'चा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या काळातच नामंजूर झाला असल्याचे समोर येत आहे.

याबाबत आदित्य ठाकरेंनी ट्वीट करत म्हटले आहे की, वेदांत-फॉक्सकॉन व बल्क ड्रग पार्क या दोन प्रकल्पांपाठोपाठ आता महाराष्ट्राला मेडिसीन डिवाइस पार्क योजनेला देखील मुकावे लागले आहे. उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ असताना महाराष्ट्रापासून आणखी एक प्रकल्प हिरावून घेण्यात आला आहे. याबद्दल सत्ताधाऱ्यांना माहिती आहे का? असे आदित्य म्हणाले होते.

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्वीटसोबत त्यांनी शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचे ट्वीट जोडले आहे. ज्यात चतुर्वेदी यांनी महाराष्ट्रातील मेडिसीन डिवाइस पार्कच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत राज्यसभेत माहिती विचारली आहे. त्यांच्या पत्राला रसायन आणि खते मंत्रालयाकडून उतर देण्यात आले आहे.

देशभरातील 'मेडिकल डिव्हाईस पार्क'च्या प्रकल्पासाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते. ज्यात महाराष्ट्राचा सुद्धा समावेश होता. एकूण ४०० कोटी रुपये आर्थिक खर्चाची ही योजना होती. ज्यात हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्य सरकारच्या 'मेडिकल डिव्हाईस पार्क'च्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली होती. विशेष म्हणजे यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते.

या प्रकल्पासाठी महाराष्ट्रासह १६ राज्यांचे प्रस्ताव आले होते. मात्र यात हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्य सरकारच्या 'मेडिकल डिव्हाईस पार्क'च्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे ही मंजुरी सप्टेंबर २०२१ मध्येच देण्यात आली होती. मात्र त्यानंतर सुद्धा मार्च २०२२ मध्ये प्रियांका चतुर्वेदी यांनी डिवाइस पार्कच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत केंद्र सरकारकडे विचारणा केली.

त्यामुळे महाराष्ट्राचा 'मेडिकल डिव्हाईस पार्क'चा प्रस्ताव नामंजूर झाला याबाबत शिवसेनेला वर्षभरानंतर सुद्धा कळाले नसावे का? असा प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे पीआयबी यांनीही सन २०२१ मध्ये ट्विट करत यासंदर्भातील पत्रक शेअर केले आहे. त्यानंतरही आदित्य ठाकरे यांनी या प्रस्तावाचा विषय लावून धरल्याचे पाहायला मिळाले.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याच्या आदित्य ठाकरेंनी पुण्यात जनआक्रोश मोर्चा काढून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली होती. महाविकास आघाडीतील अनेक नेते आजही या प्रकल्पावरून शिंदे-भाजप सरकारवर हल्लाबोल करताना पाहायला मिळत आहेत.