Mumbai Local: ...त्यानंतरच लोकल प्रवासासाठी मुभा; ठाकरे सरकारचा नवा नियम?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 03:06 PM2021-06-27T15:06:17+5:302021-06-27T15:12:08+5:30

Mumbai Local: अद्यापही केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा आहे.

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळाला. त्यामुळे सर्वसामान्यांचा लोकल प्रवास पुन्हा एकदा बंद करण्यात आला.

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास मर्यादित पातळीवर मुभा देण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढवल्यावर पुन्हा एकदा लोकल प्रवासबंदी करण्यात आली.

मात्र, कोरोनाच्या काळात लोकल प्रवासास बंदी असल्यामुळे अनेक प्रवाशांकडून बोगस ओळखपत्र दाखवून प्रवास करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

अद्यापही केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा आहे. असे असतानाही अनेक जण बनावट पास वा ओळखपत्र दाखवून प्रवास करणाऱ्यांची संख्या गेल्या अनेक दिवसांपासून वाढलेली आहे.

बोगस ओळखपत्राद्वारे प्रवास करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी तसेच लोकलबंदीचे नियम पाळले जावेत, यासाठी आता राज्य सरकारकडून नवा नियम आणला जात आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाने ऑनलाइन यंत्रणेद्वारे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे. तसेच या कर्मचाऱ्यांची पडताळणी केली जाणार आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या मोबाइलवर क्युआर कोड येणार आहे. हा क्युआर कोड रेल्वेच्या तिकीट खिडकीवर दाखवल्यानंतरच सदर कर्मचाऱ्यांना पास मिळणार असून, तसा निर्णय व नियोजन राज्य सरकारने घेतला आहे.

त्यामुळे आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना अधिकारपत्र दाखवून एकात्मिक पास मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भातील एक पत्रही रेल्वेला दिल्याची माहिती मिळाली आहे.

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्यासाठी तसेच खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकार आणि रेल्वेकडून प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आताच्या घडीलाही लाखो प्रवासी प्रवास करत आहेत. मुंबईतील कोरोनाचे प्रमाण कमी होत असताना दिसत असले, तरी लोकल प्रवासाची मुभा देण्यास राज्य सरकार अद्यापही तयार नसल्याचे पाहायला मिळत आहे.

एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत पश्चिम रेल्वेवर अनधिकृत पद्धतीने प्रवास करणाऱ्यांकडून सुमारे ३ लाख ७० हजार तसेच मध्य रेल्वेवर अशा प्रकारे प्रवास करणाऱ्यांकडून ३ लाख ५१ हजारांचा दंड वसूल केल्याचे सांगितले जात आहे.

तर, कोरोना संपेपर्यंत मुंबईत लोकल सुरू होणार नाही, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अलीकडेच स्पष्ट केले आहे.

राज्यातून कोरोना गेलेला नाही. काही जिल्ह्यात अजूनही कोरोनाची चिंताजनक स्थिती आहे. सर्वांनी कोरोनाचे नियम पाळावेत. मुंबई ही राज्याची राजधानी आहे. गर्दीचे ठिकाण आहे. त्यामुळे कोरोना संपेपर्यंत मुंबईत लोकल सुरू होणार नाही, असे ते म्हणाले.

Read in English