"साहेब, तुम्ही २ वेळा स्वप्नात आलात"; कार्यकर्त्यानं सांगताच शरद पवार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 04:37 PM2022-10-24T16:37:02+5:302022-10-24T16:39:14+5:30

पुरंदर तालुक्यातील शेतकरी संवाद कार्यक्रमानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हजर होते. या कार्यक्रमात शरद पवारांनी पुरंदरच्या शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमात थेट शेतकरी पवारांशी हितगुज साधत होते.

पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, रोजगाराचे प्रश्न,रखडलेली विकासकामे याबाबत शरद पवारांनी लोकांचे प्रश्न ऐकून तात्काळ त्यावर तोडगा काढण्याचं आश्वासन पवारांच्या वतीने देण्यात येत होते. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे यादेखील होत्या.

याच कार्यक्रमात जेजुरी ग्रामीणमधील एका शेतकऱ्याने शरद पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना आश्चर्याची गोष्ट म्हणजे मागील १० वर्षात तुम्ही माझ्या स्वप्नात २ वेळा आलेला आहात असं म्हटलं. त्यावर शरद पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेने उपस्थितांमध्ये हशा पिकला.

संवाद कार्यक्रमात शेतकरी आपापल्या समस्या सांगत होते. तेव्हा या शेतकऱ्याने शरद पवारांना उद्देशून तुम्ही माझ्या स्वप्नात २ वेळा आला आहात असं म्हटलं त्यावेळी शरद पवारांनी लागलीच हे स्वप्न पहाटे पडलं होतं की मध्यरात्री? असा प्रतिसवाल त्याला केला. त्यावर उपस्थित सगळेच जोरजोरात हसायला लागले.

याच कार्यक्रमात आणखी एका शेतकऱ्याने शरद पवारांना तुम्ही आता जास्त फिरू नका, आपले वय झालं आहे. आता तुम्ही रिमोट हाती घ्या. आमचं काय चुकलं तर मार्गदर्शन करा असं सांगत जास्त न फिरण्याचा सल्ला दिला.

शेतकऱ्याच्या या सल्ल्यावर शरद पवारांनी म्हटलं की, मी आता बाहेर फिरू नये असं एकानं सांगितले. पण कुणी सांगितले मी म्हातारा झालो, तुम्ही काय बघितलंय? मी म्हातारा झालो नाही. वय वाढते. प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याची भूमिका आमची आहे असं उत्तर त्यांना दिले.

या कार्यक्रमात पवारांनी भाजपावर निशाणा साधला. पवार म्हणाले की, गेल्या १० वर्षात भू विकास बँकेचे कर्ज शेतकऱ्यांना मिळाले आहे का? कुणी वसूलीला जात नाही. जिथे वसूली होणार नाही तिथे भू विकास बँकेचे कर्ज माफ केले अशी घोषणा राज्य सरकारने २-३ दिवसांपूर्वी केली असं त्यांनी म्हटलं.

ज्यांच्या हातात देशाची, राज्याची सूत्रे आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या हितासाठी काही ठोस पाऊले टाकली पाहिजे ती टाकायची त्यांची तयारी नाही. निर्णय घ्यायला तयार नाहीत असा आरोपही खासदार शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये असलेल्या भाजपावर केला.

त्याचसोबत १९७८ मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा खेड्यापाड्यात मोठा दुष्काळ होता. तेव्हा १५ दिवसांत मी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. माझ्याकडे केंद्राची जबाबदारी आली तेव्हा ३ महिन्यात ७२ हजार कोटींचे शेतकरी कर्ज माफ केले होते असं पवारांनी सांगितलं.

दरम्यान, संकटग्रस्त शेतकऱ्यांना नियम बाजूला ठेवून माणूस म्हणून मदत करायला हवी. जो संकटात आहे त्याचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायला हवा. अतिवृष्टीमुळे भू गर्भातील पाण्याची पातळी निदान २ वर्ष टिकेल. नुकसान झालंय त्याची भरपाई सरकारने करावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत वेळ पडल्यास संघर्ष करू असा इशाराही पवारांनी दिला.