Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree: नवनीत, रवी राणांना तीन ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते, जामिनासाठी होणार पळापळ; पोलिसांनी लावले कठोर कलम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 07:35 PM2022-04-23T19:35:34+5:302022-04-23T19:46:42+5:30

Navneet Ravi Rana Arrested: नवनीत राणा आणि रवी राणांविरोधात पोलिसांनी अनेक कलमे लावली आहेत. परंतू एक असे कलम आहे, ज्यावरून राणा दाम्पत्याला जामिनासाठीदेखील मोठी धावपळ करावी लागणार आहे.

मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचण्याचे आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणांना खार पोलिसांनी अटक केली आहे. दिवसभर चाललेल्या ड्राम्यानंतर राणा दाम्पत्याला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत राणांनी हुज्जत घातली. घराबाहेर व्हा, असेही बजावले. यानंतर काही वेळातच राणा पोलिसांसोबत खाली आले आणि पोलिसांसोबत गेले.

नवनीत राणा खाली आलेल्या असताना त्यांच्यावर बाहेर उभ्या असलेल्या शिवसैनिकांनी बॉटल फेकली. तसेच पोलिसांच्या गाडीतून बाहेर पडताना त्यांच्या गाडीवर चप्पल आणि हाताने मारण्यात आले. यावेळी पोलिसांनी गाडीतील पडदे लावलेले असल्याने राणा दाम्पत्य कुठे आहे हे कोणाला दिसू शकले नाही.

खार पोलीस ठाण्यात आल्यावर राणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना अटक करण्यात आली आहे. राणांना पोलीस पोलीस ठाण्यात नेतात की विमानतळावर हे पाहण्यासाठी शिवसैनिकांनी पाठलागही केला. परंतू, पोलीस ठाण्यात गेल्याचे पाहून ते मागे फिरले.

नवनीत राणा आणि रवी राणांविरोधात पोलिसांनी अनेक कलमे लावली आहेत. परंतू एक असे कलम आहे, ज्यावरून राणा दाम्पत्याला जामिनासाठीदेखील मोठी धावपळ करावी लागणार आहे. हे कलम आहे १५३ अ.

या कलमानुसार राणा दाम्पत्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांना तीन ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. हे अदखलपात्र गुन्हांत लावले जाते. यामुळे राणांना जामिनही मिळण्यास अडचणी येण्याची शक्यता आहे.

समाजात तेढ निर्माण करणारं विधान केल्यास कलम १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल होतो. या कलमाच्या अंतर्गत अटकेची कारवाई करायची असल्यास पोलिसांना कलम १४१ नुसार नोटीस बजवावी लागते. अन्यथा ती अटक बेकायदेशीर ठरते.

यावर राणा दाम्पत्यानेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, स्मशानात गाडण्याची भाषा करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अनिल परब आणि ५०० ते ६०० शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब यांच्यासह ७०० शिवसैनिकांवरही कलम १२०ब, १४३, १४८, १४९. ४५२, ३०७, १५३अ, २९४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राणा दाम्पत्याने केली आहे.

खासदार नवनीत राणा, रवी राणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे त्यांची आजची रात्र खार पोलीस ठाण्यातच जाणार असून उद्या त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांनी राणा दाम्पत्याला खार पोलीस ठाण्यात नेताच राणा यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. पोलीसांनी आम्हाला जबरदस्तीने पोलीस ठाण्यात नेले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नारायण राणेंच्या राज्यात लोकशाही धोक्यात आली आहे. आम्हाला मदत करावी, असे राणा म्हणाल्या.

शिवसेनेविरोधात सातत्यानं आक्रमक भूमिका घेणारे भाजप खासदार किरीट सोमय्या थोड्याच वेळात खार पोलीस ठाण्यात जाणार आहेत. 'आमदार आणि खासदारांना हनुमान चालिसेसाठी अटक करणाऱ्या महाराष्ट्रातील रावण राजचा निषेध करतो. घोटाळेबाज सरकारचं दहन होण्याची भीती मुख्यमंत्री ठाकरेंना वाटते. मी आज रात्री ९ वाजता खार पोलीस ठाण्यात जाणार आहे,' असं ट्विट सोमय्यांनी केलं आहे.