शिंदेच्या नेत्याची आमदारकी धोक्यात?; ठाकरेंच्या आमदाराचा पारा चढला, थेट बडतर्फची मागणी; फडणवीसही म्हणाले, 'काय कारवाई करायची ती करा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:55 IST2025-07-09T15:42:46+5:302025-07-09T15:55:06+5:30
Sanjay Gaikwad Anil Parab: आमदार संजय गायकवाड यांनी एका कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी थेट निलंबन किंवा बडतर्फ करण्याची मागणी केली.

आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासात असलेल्या कँटिनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली. तो मुद्दा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत मांडला.
अनिल परब विधान परिषदेत बोलताना म्हणाले, "या महाराष्ट्रात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक प्रतिमा आहे. ज्यांच्याकडे बघताना लोक सुसंस्कृत म्हणून बघतात. अशा मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये एक आमदार, माजलेला... बनियान आणि लुंगीवर कँटिनमध्ये येऊन कर्मचाऱ्यांना अक्षरशः बॉक्सिंग स्टाईलने मारतोय."
"माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, आपला या आमदारांवर वचक आहे की, नाही? आपल्या सारखा एखादा ज्याला वाटतं की, महाराष्ट्र सुसंस्कृत असला पाहिजे. आपली जी सुसंस्कृत परंपरा लोकांच्या मनात आहे. त्याला तडे देण्याचे काम अशा प्रकारे आमदार करत आहेत."
"एक आमदार निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून कँटिनच्या कर्मचाऱ्याला बनियान आणि लुंगीवर... अरे आमदाराने कसं राहावं याचे किमान काहीतरी संकेत आहेत की नाही?", असा संताप परब यांनी संजय गायकवाड यांच्या वर्तनाबद्दल व्यक्त केला.
"माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, आपल्या राज्यात काय चाललं आहे? हे आमदार बनियान टॉवेलमध्ये खाली येतात, मारतात. हे काय रस्त्यावरचे, गल्लीतील लोक आहेत का?", अशी टीका अनिल परब यांनी केली.
"कर्मचाऱ्यांना मारतात. अरे तुमच्यात ताकद आहे, तर त्या खात्याच्या मंत्र्याला मारा ना. कुणाला मारता, कर्मचाऱ्याला; काय गुन्हा आहे त्याचा? त्याचे व्हिडीओ काढून तुम्ही सोशल मीडियावर टाकता. फडणवीसजी, तुमच्या प्रतिमेला जे तडे पाडत आहेत, किमान त्यांचा तरी बंदोबस्त करा. राज्य गृहमंत्र्यांकडे कामावर शिक्कामोर्तब करा आणि तुमचे लक्ष यांच्याकडे असले पाहिजे", असे परब मुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून सभागृहात बोलले.
"माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. आपल्याकडे ज्या नजरेने जनता बघते आणि सरकारला पाठिंबा देणाऱ्या अशा आमदाराचा पाठिंबा तुम्ही घेणार का? अशा लोकांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपदी बसणं आपल्याला आवडेल का? अशा आमदारांचा बंदोबस्त करावा", असा सवाल परबांनी फडणवीसांना केला.
परब म्हणाले, "मला असं वाटतं की, निलंबित करता येत असेल, तर निलंबित करावं. कारण आमदार निवास आपल्या विधिमंडळाच्या कार्यकक्षेत येतं आणि जर मी इथे कर्मचाऱ्याला मारलं असतं, तर तुम्ही मला निलंबित करू शकला असता. आपल्याला तो अधिकार आहे."
"आमदार निवास जर अध्यक्षांच्या कार्यकक्षेत येत असेल, तर मला वाटतं की, तुम्हाला निलंबित करता येतं. माझी विनंती आहे की, त्याला निलंबित करा, बडतर्फ करा. काय करायचं ते करा, पण आपण हे खपवून घेणार नाही, हे तरी किमान महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या", अशी मागणी अनिल परब यांनी विधान परिषद अध्यक्षांकडे केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही म्हणाले, "आपण सत्तेचा गैरवापर करतोय किंवा आमदार म्हणून आपलं वर्तन योग्य नाही, असे लोकांना वाटेल. ही गंभीर बाब आहे. अध्यक्षांनी याची दखल घ्यावी आणि यासंदर्भात काय कारवाई करायची, ती करावी", अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्षांना केली.