'केवायसी' चुकलेल्या 'बहिणीं'ना दिलासा ! महिलांची होणार घरपोच पडताळणी; 'या' प्रश्नांमुळे झाला होता गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 19:57 IST2026-01-27T19:48:01+5:302026-01-27T19:57:43+5:30
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेले 'केवायसी' अपडेट करताना तांत्रिक कारणास्तव किंता अज्ञानापोटी अनेक महिलांनी चुकीचा पर्याय निवडला होता. यामुळे शेकडो पात्र महिलांचे अर्ज त्रुटींमध्ये अडकले आहेत. मात्र, आता राज्य सरकारने अशा महिलांना मोठा दिलासा दिला असून, अंगणवाडी सेविकांमार्फत या महिलांची प्रत्यक्ष घरपोच पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवायसी चुकलेल्या लाडक्या बहिणींना फार मोठा दिलासा मिळणार आहे.

आता ही माहिती तपासली जाणार - आधार कार्ड आणि बैंक खाते लिंक असल्याची स्थिती. रहिवासी पुरावा आणि कुटुंबाचे उत्पन्न, अर्जात निवडलेले पर्याय आणि प्रत्यक्ष कागदपत्रे यांची जुळवाजुळव, नाव, वय, पत्ता असा वैयक्तिक तपशील तपासला जाईल.

नोव्हेंबर-डिसेंबर या दोन महिन्यांचे हप्ते अडकले - केवायसी पूर्ण नसल्यामुळे राज्यातील पात्र महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते बँक खात्यात जमा होऊ शकले नाहीत. सणासुदीच्या काळात पैसे न मिळाल्याने महिलांमध्ये नाराजी होती. मात्र, पडताळणी यशस्वी झाल्यावर हे थकलेले हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे.

अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष पडताळणी करणार - योजनेच्या नवीन निकषांनुसार, ज्या महिलांच्या अर्जात केवायसी त्रुटी आहेत, त्यांच्या घरी अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष जातील. त्याठिकाणी महिलेची मूळ कागदपत्रे तपासून माहितीची खातरजमा केली जाईल. अंगणवाडी ताईनी ओके केल्यानंतर या महिलांच्या अर्जाचा मार्ग मोकळा होईल.

दुर्गम भागातील महिलांना सर्वाधिक बसला फटका - दुर्गम भागातील नेटवर्कच्या समस्या आणि डिजिटल साक्षरतेचा अभाव यामुळे सुमारे जवळपास १० हजार महिलांच्या अर्जात तांत्रिक चुका झाल्या आहेत. मोबाइल अॅपवर चुकीचा पर्याय निवडल्या गेल्याने या महिला योजनेच्या लाभापासून तूर्तास वंचित राहिल्या आहेत. पडताळणीनंतर त्यांना लाभ दिल्या जाईल.

'केवायसी' करताना या प्रश्नांमुळे झाला होता गोंधळ - केवायसी प्रक्रियेत तुमचे लग्न झाले आहे का ?, 'बँक खाते आधारशी संलग्न आहे का?, उत्पन्नाचा दाखला उपलब्ध आहे का? अशा प्रश्नांना उत्तर देताना अनेक महिलांनी 'नाही' हा पर्याय चुकून निवडला. काही ठिकाणी इंटरनेट कॅफे चालकांच्या चुकीमुळेही माहिती चुकीची भरली गेली, ज्याचा फटका लाभार्थीना बसला.

हजारो अर्ज 'पेंडिंग' व 'रिजेक्ट'च्या रांगेत - ऑनलाइन फॉर्म भरताना किंवा केवायसी करताना माहिती भरण्यात चुका झाल्याने हजारो महिलांचे अर्ज 'रिजेक्ट' किंवा 'पेन्डिंग'च्या रांगेत गेले होते. वारंवार सेतू केंद्रावर जाऊनही तांत्रिक अडथळे दूर होत नव्हते. आता सरकारने अंगणवाडी सेविकांवर ही जबाबदारी सोपवल्याने महिलांना कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज उरणार नाही.

















