Raj Thackeray Uddhav Thackeray: "उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख केलं तेव्हा मी बाळासाहेबांना एक प्रश्न विचारला..."; राज ठाकरेंनी उघड केलं गुपित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 09:33 PM2022-07-23T21:33:37+5:302022-07-23T21:40:52+5:30

शिवसेना कुणाची हा प्रश्न सध्याही चर्चेत.. अशा वेळी राज यांनी त्या वेळचा एक किस्सा सांगितला.

Raj Thackeray Balasaheb Thackeray: महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार २०१९ मध्ये सत्तेत आले. पण अडीच वर्षांतच शिवसेनेत घुसमट होणाऱ्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी केली. ( Uddhav Thackeray )

५० आमदारांच्या साथीने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने भाजपाशी हातमिळवणी करून सत्तास्थापना केली. त्यामुळे आता शिवसेना नक्की कोणाची? शिवसेनेचे नेतृत्व नक्की कोणाकडे जाणार? असे प्रश्न सामान्य शिवसैनिकापुढे आहेत.

असे असतानाच शिवसेनेचे नेतृत्व महाबळेश्वरच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्याच्या निर्णयावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. उद्धव यांच्याकडे पक्षप्रमुख पद सोपवल्यानंतर राज यांनी बाळासाहेबांना नक्की काय प्रश्न विचारला त्याबद्दल त्यांनी सांगितले.

महाबळेश्वरच्या शिवसेनेच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पद देण्यात यावे असा प्रस्ताव खुद्द राज ठाकरे यांनीच मांडला होता. या ठेवलेल्या प्रस्तावाबद्दल मला कोणताही पश्चात्ताप होत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

"बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका मांडली. प्रखर हिंदूत्व म्हणजे काय ते बाळासाहेब ठाकरेंकडून शिकलं पाहिजे. बाळासाहेबांचा हा विचार कोण जिवंत ठेवतंय हे आता लोकांनी पाहावं", असेही राज यांनी स्पष्ट केलं.

"हे लोकं ढोंगी आहेत. बाळासाहेबांच्या नावाचा वापर करून घेतात आणि पदरात पाडून घेता येईल तेवढं घ्यायचं. नंतर फटका बसला की एवढंसं तोंड करून बसायचं. हे आधी आजारी होते, मंत्रालयातही जात नव्हते पण आता मात्र शिवसेना भवनात जातात", अशी टीका राज यांनी केली.

"मला कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात किंवा कुणाच्या कुटुंबात जायचं नाही. पण हा विचार झालाच पाहिजे", अशा शब्दांत झीचोवीसतासच्या मुलाखतीत त्यांनी उद्धव यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

त्यानंतर राज ठाकरे यांनी आणखी एक गुपित उघड केलं. उद्धव यांना पक्षप्रमुख पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी एक गोष्ट सांगितली.

"आता माझा पक्षातील रोल काय? माझी जबाबदारी काय आहे?" असा प्रश्न मी बाळासाहेब ठाकरेंना विचारला. "कारण मी फक्त भाषणाच्या वेळी बाहेर निघणार आणि इतर वेळी गपचूप बसून राहणार, हे मला मान्य नव्हतं", असेही राज यांनी स्पष्ट केले.