शिवसेनेमध्ये जुंपलीय, फडणवीसही बिझी; पण एक 'ठाकरे' करताहेत शांतीत क्रांती अन् लोकल कनेक्टवर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 06:09 PM2022-07-20T18:09:57+5:302022-07-20T18:19:13+5:30

एकीकडे राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. अगदी कोर्टाच्या फेऱ्या सुरू आहेत. तर सत्तेत येऊन फडणवीसही बिझी झालेत. दुसरीकडे एक युवा ठाकरे राज्यभर दौरा करत फिरतोय. तरुणाईशी संपर्क साधतोय. संघटना मजबूत करतोय.

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत जिथं शिवसेना नेमकी कुणाची? यावरुन लढाई सुरू आहे. तर भाजपाला पुन्हा सत्तेत आल्यानं स्फुरण चढलं आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहिली जात आहे. पण ठाकरे मात्र राज्यात ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर लोकांच्या भेटीगाठी घेण्यात व्यग्र आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) राज्यातील सत्तासंघर्षापासून बरीच दूर आहे. अध्यक्ष राज ठाकरे देखील शस्त्रक्रियेमुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करत होते. तेही अजून फारसे काही बोलले नाहीत आणि सक्रिय देखील झालेले नाहीत. पण आपल्या पक्षाची बांधणी करण्याची धुरा अमित ठाकरेंनी घेतलेली दिसत आहे.

अमित ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेच्या पुर्नबांधणीसाठी संपूर्ण राज्य पिंजून काढत आहेत. तळागळात जाऊन तरुणाईशी संवाद साधत आहेत. आजची तरुण पिढी आपली उद्याची मतदार आहे हे व्यवस्थित जोखून अमित ठाकरे कामाला लागलेत.

अमित ठाकरेंच्या महासंपर्क दौऱ्याला तरुणाई देखील चांगला प्रतिसाद देतेय. मंगळवार सकाळी मीरा भाईंदर, दुपारी वसई विरार आणि रात्री पालघर बोईसर येथे अमित ठाकरे यांनी दौरा केला. प्रत्येक ठिकाणी त्यांना भेटायला दोनशेहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी आले होते.

अमित ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे ठाणे पालघर जिल्ह्यात मनसे कार्यकर्त्यांना बळ मिळणार असल्याचा विश्वास स्थानिक नेते व्यक्त करत आहे. पालघर-डहाणूच्या दौऱ्यावर अमित ठाकरे यांनी दुपारचे जेवण त्यांनी डहाणू तालुक्यातील नरपड मांगेला समाज वाडीतल्या श्री. सचिन हरिश्चंद्र तांडेल या पायाने अधू असलेल्या कबड्डीपटूच्या घरी केले.

अमित ठाकरे यांनी para kabaddi मध्ये राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून कामगिरी बजावणाऱ्या सचिन हरिश्चंद्र तांडेल यांच्यासोबत कबड्डीबाबत सविस्तर चर्चा केली आणि त्यांना मिळालेली सर्व पारितोषिकं बघून कौतुक केले. तांडेल कुटुंबियांच्या घरचा कोंबडीचा रस्सा खूप आवडल्याचंही अमित ठाकरे यांनी आवर्जून सांगितलं.

सकाळी १० वाजता अमित यांनी मीरा भाईंदर येथील बैठक घेतली, तर रात्री ११ वाजता त्यांची पालघर बोईसर येथील बैठक संपली. मीरा भाईंदरमध्ये जोरदार प्रतिसाद लाभला. मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १.३० दरम्यान नवघर येथे महाविद्यालयीन विद्यार्थी, मनविसे तसंच पक्ष पदाधिकाऱ्यांशी अमित ठाकरे यांनी संवाद साधला.

वसई विरार महापालिकेतील पदाधिकारी तसंच विद्यार्थ्यांना अमित ठाकरे नालासोपारा येथे भेटले. शेकडो विद्यार्थ्यांनी यावेळी मनसेत प्रवेश केला. या विद्यार्थ्यांशी तसंच स्थानिक पदाधिकाऱ्यांशी अमित यांनी संवाद साधला. ठिकठिकाणी झालेले स्वागत, पदाधिकाऱ्यांशी झालेला प्रदीर्घ संवाद आणि नवीन विद्यार्थी तरुणांच्या मुलाखती यांमुळे अमित यांना पालघर बोईसर येथे पोहोचायला रात्रीचे १०.१५ वाजले. त्यापुढे रात्री ११ उलटले, तरी अमित ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधला.

मागील महिनाभरापासून अमित ठाकरे सातत्याने पदाधिकारी आणि युवक युवतींच्या भेटीगाठी घेत आहेत. मनसेच्या शाखांमध्ये जात पक्षाला नवी उभारी देण्याचा प्रयत्न करत आहेत. पालघर-डहाणू दौऱ्याआधी त्यांनी कोकण आणि रायगडचाही दौरा केला. कोकणात पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. तसंच तरुणाईशीही संपर्क साधला.

राजसाहेब ठाकरे यांच्या कानावर जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सांगता येत नाही अशी तक्रार खंत अमित ठाकरे यांच्यापुढे व्यक्त केली. त्यावर "आता यापुढे तुम्ही माझ्या थेट संपर्कात राहू शकता. तुम्हाला गरज पडली तर कधीही माझी वेळ घेऊन राजगड मुख्यालयात येऊन मला भेटू शकता " अशी ग्वाही त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिली.

सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला येथील विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी यांच्याशी प्रत्येक तालुक्याबाबत चर्चा केली आणि लवकरच संघटनात्मक पुनर्बांधणी करून जुन्या व नवीन पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन नवीन रचना करण्यात येईल असे स्पष्ट संकेत दिले आहेत.