LMOTY 2019: भाजपा, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी नेते एकाच टेबलवर भेटतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 05:41 AM2019-02-21T05:41:03+5:302019-02-21T06:15:22+5:30

दिल्ली ते गल्ली निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. लोकसभेच्या महासंग्रामात उतरण्याचा, विरोधकांना नामोहरम करण्याचा निर्धार युती-आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्यात. परंतु, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'च्या महासोहळ्यात वेगळंच चित्र पाहायला मिळालं.

युतीच्या घोषणेला दोन दिवसच झालेत. परंतु, भाजपा-शिवसेनेचे नेते, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, दिवाकर रावते, सुभाष देसाई ही चौकडी, झालं गेलं विसरून, 'मनसे' एकमेकांजवळ येण्याचा प्रयत्न करत असल्याचं लोकमतच्या कार्यक्रमात पाहायला मिळालं. इतकंच नव्हे तर, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे हेही त्यांच्या टेबलवर गप्पांमध्ये रंगल्याचं दिसलं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं आगमन झाल्यानंतर वातावरण थोडं गंभीर झालं. वागण्या-बोलण्यात औपचारिकता आल्यासारखी वाटली. परंतु, उद्धव यांनीच चंद्रकांत पाटील यांना खुर्ची जवळ घ्यायला सांगितली आणि पुन्हा गप्पांची मैफल रंगली.

उद्धव यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच, चंद्रकांतदादांनी स्वतःच खुर्ची उचलून त्यांच्या जवळ ठेवली. तेव्हा, दोघांनीही मनं जिंकली.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांना राजकारण गटातील महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी एकमेकांसमोर नतमस्तक होतं या दोघांनी आपल्या मनाच्या मोठेपणाचं दर्शन घडवलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही स्टेजवरच होते. शिवसेना-भाजपा नेत्यांची ही जवळीक कार्यकर्त्यांना नक्कीच काहीतरी संदेश देऊन जाईल.