Vidhan Parishad Election: 'मविआ'तील विसंवादामुळे बैठक फिस्कटली; भाजपानं ६ उमेदवार देण्याचं धाडस का केले?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 05:08 PM2022-06-09T17:08:12+5:302022-06-09T17:11:02+5:30

राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ऐतिहासिक सत्तासंघर्ष पाहायला मिळाला. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून शिवसेना-भाजपात बिनसलं. त्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली.

शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाने एकत्र येत राज्यात महाविकास आघाडीची स्थापना केली. किमान समान कार्यक्रम आखत महाविकास आघाडी सत्तेवर आली. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं.

मविआनं विधानसभेत बहुमत सिद्ध केले. त्यानंतर मागील अडीच वर्षापासून हे सरकार पडणार असल्याची विधानं भाजपा नेते सातत्याने करत होते. कारण मविआतील आमदार एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही.

निधीवाटपावरून काँग्रेस-शिवसेनेचे आमदार जाहीर नाराजी व्यक्त करतात. मात्र उद्धव ठाकरे, शरद पवार सावधपणे ही नाराजी दूर करतात. परंतु आमदारांच्या मनातील खदखद बाहेर येण्याची पहिलीच संधी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे.

आमदार फुटतील या भीतीने महाविकास आघाडीतील नेत्यांनी अद्याप विधानसभेच्या अध्यक्षपदाची खुर्ची रिक्त ठेवली आहे. त्यात राज्यसभा, विधान परिषद निवडणुका बिनविरोध करण्याचे प्रयत्न महाविकास आघाडीतील विसंवादामुळे फसले असा दावा जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी केले आहेत.

विनय कोरे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या तीन पक्षात समन्वय नाही. ही निवडणूक बिनविरोध होता होता का राहिली? याचा अभ्यास करावा लागेल. राज्यसभेची जागा बिनविरोध व्हावी यासाठी त्याबदल्यात भाजपानं विधान परिषदेची पाचवी जागा सोडावी यावर चर्चा झाली.

परंतु भाजपा जी जागा सोडणार त्यावर कुणाचा हक्क असेल यावर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे एकमत झाले नाही. शिवसेनेचं म्हणणं होतं की, जर राज्यसभेत आम्ही १ जागा सोडणार असू तर विधान परिषदेची पाचवी जागा आम्हाला मिळायली हवी.

मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीनं शिवसेनेला सांगितले की, महाविकास आघाडीत ठरल्याप्रमाणे विधान परिषदेच्या त्या जागा समसमान वाटून घ्यायला हव्यात. काँग्रेसला २, शिवसेनेला २ आणि राष्ट्रवादीला २ जागा. परंतु यात समन्वय न झाल्याने देवेंद्र फडणवीसांसोबत झालेली बैठक फिस्कटली असं विनय कोरेंनी म्हटलं.

त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून जो समन्वय शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात असायला हवा होता तो झाला नाही. बैठकीच्या निमित्ताने समन्वयाचा अभाव दिसून आला. त्याचे परिणाम राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळतील असंही विनय कोरे यांनी सांगितले.

राज्यसभा निवडणुकीत ३ आणि विधान परिषद निवडणुकीत भाजपाने ५ आणि अपक्ष म्हणून सदाभाऊ खोत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. पाचव्या जागेसाठी मतांचा कोटा कमी असताना भाजपाने खोत यांना उतरवण्याचं धाडस मविआतील नाराज आमदारांच्या जीवावर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.