जाणून घ्या, कसा आहे शिवसेनेचा 53 वर्षाचा धगधगता इतिहास!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 12:44 PM2019-06-19T12:44:30+5:302019-06-19T12:52:09+5:30

मुंबईसह महाराष्ट्र व्हावा म्हणून १०५ जणांनी हुतात्मा पत्करलेल्या मुंबईत मात्र स्थलांतर, परप्रांतीयांचे प्रमाण वाढीस लागून मराठी माणसाची कुचंबना होत होती. मराठी माणसांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि भूमीपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना असावी या विचारातून १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली.

शिवसेनाप्रमुखांची श्रद्धा आई भवानीवर होती. त्यामुळे भवानी मातेचे वाहन असलेला वाघ हे शिवसेनेचे बोधचिन्ह खुद्द बाळासाहेबांनी साकारले. ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतीर्थावर आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्यास मुंबई आणि महाराष्ट्र भारातून भरघोस प्रतिसाद लाभला.

1990-91 मध्ये विधानसभेत शिवसेनेचे 52 आमदार निवडून आले होते. 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेने विरोधी पक्षनेता बसवला

1995 मध्ये शिवसेना-भाजपा युतीची सत्ता महाराष्ट्रात आली. त्यानंतर मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री बनले तर 1996 मध्ये शिवसेनेचे 15 खासदार दिल्लीत निवडून गेले

1997 मध्ये 103 नगरसेवक मुंबई महापालिकेत निवडून शिवसेनेने महापालिकेवर कब्जा घेतला. आजतागायत शिवसेनेची मुंबई महापालिकेवर सत्ता आहे.

2003 मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली.

तर 2010 मध्ये आदित्य ठाकरे यांच्यासाठी युवासेनेची स्थापना करत युवासेनेच्या अध्यक्षपदावर आदित्यची निवड केली.

2014 मध्ये लोकसभा युतीमध्ये शिवसेनेने 18 खासदार दिल्लीत पाठवले तर त्यानंतर झालेल्या विधानसभेत स्वबळावर शिवसेनेने 63 आमदार निवडून आणले. कालांतराने शिवसेनेने भाजपाशी तडजोड करत सत्तेत सहभाग घेतला.

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा 18 खासदार निवडून आणले. दरम्यानच्या काळात शिवसेना नेतेपदी आदित्य ठाकरे यांची निवड करण्यात आली असून आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून प्रमोट करण्यासाठी शिवसेना नेत्यांची लगबग सुरु असताना दिसत आहे.