'भंगारवाला असल्याचा मला अभिमान', असं म्हणणाऱ्या नवाब मलिकांची संपत्ती किती? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 05:09 PM2021-11-03T17:09:25+5:302021-11-03T17:24:50+5:30

नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्याक, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आहेत. मात्र, आज आम्ही आपल्याला नवाब मलिक यांची संपूर्ण पार्श्वभूमी, त्यांचे शिक्षण, त्यांची संपत्ती आणि ते सातत्याने चर्चेत का असतात, यासंदर्भात सांगणार आहोत.

महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर एकापाठोपाठ एक, असे अनेक गंभीर आरोप केले आहेत. क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खानच्या अटकेनंतर हा आरोपांचा सिलसिला सुरू झाला. यानंतर, राज्यात समीर वानखेडे Vs नवाब मलिक, असे चित्र निर्माण झाले आहे.

नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्याक, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आहेत. मात्र, आज आम्ही आपल्याला नवाब मलिक यांची संपूर्ण पार्श्वभूमी, त्यांचे शिक्षण, त्यांची संपत्ती आणि ते सातत्याने चर्चेत का असतात, यासंदर्भात सांगणार आहोत.

नवाब मलिकांचा जन्म उत्तर प्रदेशातील - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा जन्म 1959 साली उत्तर प्रदेशातील बलरामपूरमधील उत्रौला तालुक्यातील धुसवा येथे झाला. नोंदीनुसार, ते संपूर्ण कुटुंबासह 1970 मध्ये मुंबईत आले. त्यांनी अंजुमन हायस्कूलमधून 10वी आणि नंतर 1978 मध्ये बुरहानी कॉलेजमधून 12वीपर्यंतचे शिक्षण घेतले. मलिक हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून ओळखले जातात.

भंगारवाला असल्याचा मला अभिमान - भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी मलिक यांच्याविरोधात नुकताच 100 कोटींचा दावा दाखल केला आहे. यासंदर्भात मलिक यांना एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर 100 कोटींची माझी पात्रता तरी आहे का? असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला होता. एवढेच नाही, तर माझी संपूर्ण संपत्ती विकली तरी 100 कोटी रुपये मिळणार नाहीत. माझा भंगाराचा धंदा आहे आणि भंगारवाला असल्याचा मला अभिमान आहे. माझे कुटुंब आजही भंगाराच्या व्यवसायात आहे. त्यात लपवण्यासारखं काहीच नाही, असे मलिक यांनी म्हटले होते.

नवाब मलिकांकडे आहे एवढी प्रॉपर्टी - 'माय नेता' वरील माहितीनुसार, नवाब मलिक यांनी 1979 मध्ये पदवीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. मात्र, ते शिक्षण पूर्ण करू शकले नाही. मलिक यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक यांनी त्यांच्या निवडणूक शपथपत्रात 5 कोटी 74 लाख 69 हजार रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. याशिवाय त्यांनी त्यांच्यावर सुमारे 45 लाख रुपयांचे कर्ज असल्याचेही दाखवले आहे. याशिवाय, नवाब मलिक आणि त्यांची पत्नी महजबीन मलिक यांची स्टील, हीरा डायमंड, मलिक इन्फ्रा यांसह अनेक कंपन्यांमध्ये भागिदारीही आहे.

मलिक यांच्या नावावर किती फ्लॅट आणि जमीन? - याशिवाय, नवाब मलिक यांच्या नावावर स्कोडा कारची नोंद आहे. तर त्यांची पत्नी महजबीन यांच्या नावावर मारुती इर्टिका कारची नोंद आहे. तसेच, त्यांची आणि त्यांच्या पत्नीची उत्तर प्रदेशातील बलरामपूर आणि महाराष्ट्रातील उस्मानाबाद येथे काही एकर शेतजमीनही आहे. याशिवाय नवाब मलिक आणि त्यांची पत्नी महजबीन यांच्या नावावर मुंबईतील कुर्ला परिसरात एक-एक फ्लॅटही आहे.

असे आहे त्यांचे कुटुंब - त्यांच्या कुटुंबासंदर्भात बोलायचे झाल्यास. त्यांच्या कुटुंबात पत्नी महजबीन, मुलगा फराज, आमिर आणि मुली निलोफर आणि सना आहेत. नवाब मलिक यांच्या जावयाचे नाव समीर खान असे आहे. समीर खान नीलोफरचा नवरा आहे.

गेल्या वर्षी अभिनेता सुशांत सिंह राजपूत मर्डर केसनंतर, समीर खान ड्रग्स प्रकरणात कारागृहातही गेला आहे. नवाब मलिक यांचा एक मुलगा पेशाने वकील आहे. नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्षही आहेत.

शरद पवारांच्या अत्यंत जवळचे आहेत मलिक - नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. मात्र, त्यांचा इथपर्यंतचा प्रवास खूप मोठा आहे. नवाब मलिक यांनी 1996 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातील नेहरू नगरमधून निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले. त्यानंतर 1999 आणि 2004 मध्येही त्यांनी येथून विजय मिळवला. 2009 मध्ये, मलिक यांनी अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि सलग चौथ्यांदा आमदार झाले. 2014 मध्येही त्यांनी याच विधानसभेतून पुन्हा निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मलिक पुन्हा येथूनच लढले आणि पाचव्यांदा आमदार झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक...