Navneet Kaur Rana: लव्ह जिहादचे आरोप करणाऱ्या नवनीत राणांची लव्ह स्टोरी माहितीये? ‘असा’ झाला रवींशी प्रेमविवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 08:20 PM2022-09-09T20:20:59+5:302022-09-09T20:25:47+5:30

आताच्या घडीला अमरावतीतील बेपत्ता तरुणीसोबत लव्ह जिहाद झाल्याचा आरोप केल्यामुळे खासदार नवनीत राणा चर्चेत आल्या आहेत.

आताच्या घडीला अपक्ष खासदार नवनीत राणा चांगल्याच अडचणीत आल्याचे दिसत आहे. अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये एका युवतीचे अपहरण झाल्याची तक्रार घेऊन खासदार नवनीत राणा पोहोचल्या होत्या. त्यांनी हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यातच पोलिसांसोबत हुज्जत घालून राडा केला होता. (Navneet Kaur Rana)

खासदार नवनीत राणा यांचा रूद्रावतार पाहून पोलिस कर्मचारीही सुरूवातीला गोंधळून गेले. पण अखेर ती युवती स्वत:च्या मर्जीने घरातून निघून गेल्याचे स्पष्ट झाल्याने नवनीत राणा तोंडघशी पडल्या. त्यानंतर पोलीसांच्या संघटनेने नवनीत राणांचा जाहीर निषेध केला. नवनीत राणा यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा, अशीही मागणी करण्यात येत आहे. मात्र, रवी राणा आणि नवनीत राणा यांची प्रेमकहाणी रंजक आहे, जाणून घेऊया... (navneet rana and ravi rana love story)

नवनीत कौर यांचा जन्म मुंबईत झाला. कौर यांनी काही तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. नवनीत मूळ पंजाबी आहेत. त्यांचे वडील सैन्यात अधिकारी होते. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर नवनीत यांनी शिक्षण सोडून मॉडेल म्हणून काम करायला सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी ६ म्युझिक अल्बममध्ये काम केले.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना २०१४ साली नवनीत राणा यांनी आपल्या राजकीय करिअरला सुरूवात केली. सर्वसामान्य माणसांशी आपुलकीने बोलणे आणि घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मदत करणे या कारणांमुळे खासदार राणा या मध्यमवर्गीयांचे नेहमीच जवळच्या खासदार बनल्या.

योगामध्ये विशेष रुची असलेल्या नवनीत कौर राणा या बाबा रामदेव यांच्या शिष्या होत्या. नवनीत राणा त्यांना आपल्या पित्यासमान मानत असल्याचेही बोलले जाते. एका योग शिबिरात नवनीत यांची आमदार रवी राणा यांच्याशी भेट झाली होती. त्यानंतर हे नाते पुढे नेण्यासाठी दोघांनी बाबा रामदेव यांच्याकडून परवानगी घेतली होती.

रवी राणा आणि नवनीत कौर सामूहिक विवाह सोहळ्यात लग्नबंधनात अडकले. हा कार्यक्रम ३ फेब्रुवारी २०११ रोजी अनेक राजकीय नेते आणि व्हीआयपींच्या उपस्थितीत झाला होता. याच कार्यक्रमात नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाबा रामदेवही उपस्थित होते.

नवनीत राणा यांना २०१४ मध्ये प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसने तिकिटावर लोकसभेसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरवले. त्या निवडणुकीत नवनीत यांचा पराभव झाला मात्र त्यांनी जनसंपर्क कायम ठेवला. राजकारणात प्रवेश केल्यानंतर चित्रपटसृष्टीला त्यांनी अलविदा केला.

सन २०१९ मध्ये नवनीत राणा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन मिळवून खासदार झाल्या. लोकसभेत जाताच त्यांनी पुन्हा केंद्रातील सत्ताधारी भाजपला पाठिंबा दिला. नवनीत राणा यांनी शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांचा पराभव केला.

मोदी सरकारच्या अनेक योजनांचे कौतुक नवनीत राणा यांनी केले आहे. हनुमान चालिसा प्रकरणी रवी राणा आणि नवनीत राणा यांना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. स्थानिक दंडाधिकार्‍यांच्या आदेशानुसार त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आणि ४ मे २०२२ रोजी या प्रकरणाबाबत मीडियाशी न बोलण्याचे निर्देश दिले.