Jalgaon Train Accident: चाकातून ठिणग्या, आगीची अफवा अन् ११ मृत्यू; समोरून येणारी एक्सप्रेस न दिसण्याचं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 20:08 IST2025-01-22T20:03:06+5:302025-01-22T20:08:29+5:30

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे एक मोठा रेल्वे अपघात घडला आहे. पुष्पक एक्सप्रेस ट्रेन जी लखनौहून मुंबईच्या दिशेने येत होती. त्या ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. ज्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आणि काहींनी साखळी ओढली. त्यात ट्रेन पूर्णपणे थांबणार तेवढ्यात लोकांनी उड्या मारायला सुरू केले.
प्रवाशांनी न लागलेल्या आगीच्या अफवेतून जीव वाचवण्यासाठी उड्या घेतल्या परंतु दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या कर्नाटक बंगळुरू एक्सप्रेसने त्यांना धडक दिली. या अपघातात ११ मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त करण्यात आली आहे. अनेक जण यात गंभीर जखमी आहेत ज्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनौहून मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या बी ४ कोचमध्ये स्पार्किंग होत असल्याने ती थांबवण्यात आली. ही स्पार्किंग शॉर्ट सर्किटमुळे नाही तर हॉट एक्सेल ब्रेक बायडिंगमुळे होत होते. त्यामुळे बी ४ कोचच्या रेल्वे चाकांमध्ये ठिणग्या निघत होत्या आणि त्यातून धूर येत होता.
हे पाहून काही प्रवाशांना ट्रेनमध्ये आग लागल्याचं वाटलं. त्यानंतर या गोंधळात जवळपास ५०-६० प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू केली. त्यात अनेकांनी ट्रेनच्या दुसऱ्या बाजूला ट्रकवर उड्या घेतल्या. पण त्याच वेळी कर्नाटक एक्सप्रेस तिथून येत होती त्यात ११ प्रवाशांना धडक बसल्याने ते दगावले आणि काही प्रवाशी गंभीर जखमी झाले.
रेल्वेची ही दुर्घटना मुंबईपासून ४०० किमी अंतरावर जळगावातील परधाडे - माहेजी रेल्वे स्टेशनदरम्यान घडली. कर्नाटक एक्सप्रेस बंगळुरूच्या यशवंतपूर रेल्वे स्टेशनहून दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्टेशनला जात होती. तर पुष्पक एक्सप्रेस लखनौहून मुंबईच्या दिशेने येत होती.
भुसावळ विभागीय रेल्वेतील सूत्रांनुसार, ज्याठिकाणी ही दुर्घटना घडली तिथे शार्प टर्न आहे. त्यामुळे कदाचित प्रवाशांना दुसऱ्या ट्रॅकवरून येणारी ट्रेन दिसली नाही. पुष्पक एक्सप्रेसमध्ये चेन पुलिंग करण्यात आली होती. धुरामुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली ज्यामुळे काहींनी साखळी ओढली आणि ट्रेनचा स्पीड कमी होताच काहींनी रेल्वे बाहेर उड्या मारल्या.
तर पुष्पक एक्सप्रेस ट्रेनमधील फक्त एका कोचचे प्रवाशी खाली उतरले होते. दुर्घटनेची माहिती मिळताच २० मिनिटांच्या आत रेल्वेची एक्सीडेंट रिलीफ ट्रेन घटनास्थळी पाठवण्यात आली. त्यानंतर स्थानिक प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाकडून जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल डी यांनी दिली.
दरम्यान, रेल्वे दुर्घटनेची माहिती मिळताच नाशिक विभागीय अधिकारी प्रवीण गेदाम हे अतिरिक्त एसपी, जिल्हाधिकारी यांच्यासोबत घटनास्थळी पोहचले. त्यानंतर रेल्वे प्रशासनासोबत मिळून बचाव कार्य सुरू केले. ८ रूग्णवाहिकेच्या मदतीने मृतांना आणि जखमींना हॉस्पिटलला पाठवण्यात आलं.