शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

गर्भातील व्यंग वेळेत ओळखणे आधीच शक्य ! आता ॲनॉमली स्कॅन बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 19:27 IST

1 / 7
जन्मजात व्यंग बालमृत्यूचे प्रमुख कारण - गत तीन वर्षांतील राज्यातील बालमृत्यूंच्या विश्लेषणातून जन्मजात व्यंग (कन्जानायटल अॅनॉमली) हे बालमृत्यूंचे एक महत्त्वाचे कारण असल्याचे आढळले आहे. हृदय, मेंदू, किडनी, हात-पाय किंवा इतर अवयवांमध्ये असलेल्या जन्मजात दोषांमुळे नवजात बालकांचे जीव धोक्यात येतात. त्यामुळे गर्भावस्थेतच या दोषांचा शोध घेणे अत्यंत गरजेचे मानले जात आहे.
2 / 7
पात्र व अतिजोखमीच्या गर्भवतींचे 'ॲनॉमली स्कॅन' - आरोग्य विभागाने गर्भधारणेच्या ठरावीक टप्प्यावर पात्र व उच्च जोखमीच्या गर्भवतींचे ॲनॉमली स्कॅन करणे आवश्यक केले आहे. साधारणपणे गर्भधारणेच्या १८ ते २२ आठवड्यांच्या दरम्यान ही तपासणी केली जाते. या तपासणीत गर्भाची वाढ, अवयवांची रचना आणि संभाव्य व्यंग तपासले जाते.
3 / 7
सर्व रुग्णालये, सोनोग्राफी केंद्रांना शासनाचे आदेश - राज्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालये, प्रसूतीगृहे, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, तसेच सोनोग्राफी केंद्रांनी पात्र व उच्च जोखमीच्या गर्भवर्तीचे ॲनॉमली स्कॅन करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. याबाबत जिल्हास्तरावर देखरेख ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
4 / 7
'ॲनॉमली स्कॅन' म्हणजे काय, कसे करतात ? - ॲनॉमली स्कॅन ही गर्भातील बाळाच्या अवयवांची सविस्तर तपासणी करणारी विशेष सोनोग्राफी आहे. या तपासणीत अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञानाचा वापर करून गर्भाच्या शरीरातील विविध अवयवांची रचना आणि वाढ तपासली जाते. ही प्रक्रिया वेदनारहित असून, गर्भवती आणि बाळासाठी सुरक्षित मानली जाते.
5 / 7
'ॲनॉमली स्कॅन'मध्ये काय पाहिले जाते? - या तपासणीत गर्भाच्या मेंदू, हृदय, पोट, किडनी, पाठीचा कणा, हात-पाय, चेहरा, तसेच इतर अवयवांची रचना तपासली जाते. बाळाची वाढ योग्य आहे का, अवयवांमध्ये कोणती विकृती आहे का, याचीही तपासणी केली जाते.
6 / 7
गर्भात व्यंग आढळल्यास काय? - ॲनॉमली स्कॅनमध्ये गर्भात व्यंग आढळल्यास संबंधित तज्ज्ञांकडून पुढील तपासण्या आणि उपचारांबाबत मार्गदर्शन दिले जाते. काही प्रकरणांमध्ये गर्भधारणेबाबत वैद्यकीय सल्ला घेऊन पुढील निर्णय घेतला जातो.
7 / 7
उच्च जोखमीच्या गर्भवती कोणत्या? - ३५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या गर्भवती, पूर्वी जन्मजात व्यंग असलेले बाळ झालेल्या महिला, मधुमेह किंवा रक्तदाबासारख्या आजारांनी ग्रस्त महिला, नातेवाइकांमध्ये अनुवांशिक आजार असलेली कुटुंबे, तसेच गर्भधारणेदरम्यान काही गुंतागुंत निर्माण झालेल्या गर्भवती या गटात मोडतात.
टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीpregnant womanगर्भवती महिलाnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्य