एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री पद गेले तर? काय होईल, लोकांना काय वाटतेय; सी व्होटरचा ताजा सर्व्हे आला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 04:21 PM2023-04-27T16:21:05+5:302023-04-27T16:25:27+5:30

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अशी परिस्थिती आहे की केव्हाही काहीही होऊ शकते. आता ज्याला त्याला मुख्यमंत्री व्हायची स्वप्ने पडू लागली आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अशी परिस्थिती आहे की केव्हाही काहीही होऊ शकते. आता ज्याला त्याला मुख्यमंत्री व्हायची स्वप्ने पडू लागली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर भाजपासोबत जात त्यांनी सत्ता स्थापन केली.

. त्यांच्या विरोधातील याचिकेवर कोणत्याही क्षणी निकाल येण्याची शक्यता आहे. शिंदेची आमदारकी जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच जर शिंदेंचे मुख्यमंत्री पद गेले तर काय, एबीपी सीव्होटरने एक सर्व्हे केला आहे.

राज्यात ठिकठिकाणी विरोधी पक्षनेते अजित पवार हे भावी मुख्यमंत्री होणार असल्याचे बोर्ड लागत आहेत. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस पुढील मुख्यमंत्री असे बोर्ड लावले जात आहेत. यामुळे शिंदे जाणार याचा अंदाज विरोधकांनाच नाही तर सत्तेतील भाजपा कार्यकर्त्यांनाही आल्याचे यावरून दिसत आहे.

सोमवार ते बुधवार या काळात केलेल्या सर्व्हेत निवडणूक लागण्याकडे सर्वांधिक लोकांचा कल दिसला आहे. म्हणजे, सत्तासंघर्षाचा एकदा काय तो सोक्षमोक्ष होऊन जाऊद्या, शिवसेना कोणाची हे पण कळेल आणि शिंदे चूक की बरोबर हे देखील, या अविर्भावात जनता असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. निवडणुकीला ३२ टक्के लोकांनी मत दिले आहे.

तर १९ टक्के मते ही लोकांनी शिंदेंचे मुख्यमंत्री पद गेले तर भाजपाने उद्धव ठाकरेंसोबत हात मिळवावा आणि सत्तेत रहावे असे म्हटले आहे. दोन्ही पक्षांनी आपापसातील वाद विसरून पुन्हा एकत्र यावे असे यामागे मानले जात आहे.

१२ टक्के लोकांना भाजपाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार बनवावे असे वाटत आहे. म्हणजे अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता यातून दिसत आहे.

मविआ उद्या असेल की नाही असे जरी पवार म्हणाले असले तरी १९ टक्के लोकांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एकत्र राहुनच सरकार बनवावे असे वाटत आहे. तर १८ टक्के लोकांनी शिंदेंचे मुख्यमंत्री पद गेले तर काय होईल माहिती नाही असे सांगितले.

एबीपी आणि सी व्होटरने हा सर्व्हे राजकारणातील ताज्या घडामोडींवर केला आहे. सोमवार, २४ एप्रिल ते बुधवार २६ एप्रिल असे तीन दिवस हा सर्व्हे केला आहे.