Gram Panchayat Election Result Maharashtra: मोठा उलटफेर! ठाकरेंची सेना, राष्ट्रवादीने अचानक घेतली मोठी झेप, भाजपा-शिंदे सेनेला पछाडले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 02:24 PM2022-12-20T14:24:53+5:302022-12-20T14:31:40+5:30

Gram Panchayat Election Result: कोणाच्या किती ग्राम पंचायती, कोणाचे किती सरपंच यावरून देखील या पक्षांमध्ये दावे केले जाणार आहेत. सध्या ७ हजार १३५ ग्रामपंचायतींपैकी अडीज हजाराच्या आसपास निकाल हाती आले आहेत. यात सकालच्या कलांपेक्षा मोठे उलटफेर दिसत आहेत.

यंदाच्या ग्राम पंचायत निवडणुका पाच महिन्यांपूर्वी झालेल्या सत्तांतरामुळे खुप महत्वाच्या आहेत. सर्वच पक्ष आपणच कशी बाजी मारलीय ते दाखविण्यासाठी आतुर झालेले आहेत. अत्यंत चुरशीचे असे निकाल लागत आहेत. कोणाच्या किती ग्राम पंचायती, कोणाचे किती सरपंच यावरून देखील या पक्षांमध्ये दावे केले जाणार आहेत. सध्या ७ हजार १३५ ग्रामपंचायतींपैकी अडीज हजाराच्या आसपास निकाल हाती आले आहेत. यात सकालच्या कलांपेक्षा मोठे उलटफेर दिसत आहेत.

राज्यातील मतदानाची आकडेवारी ७४ टक्क्यांपर्यंत गेली आहे. सदस्यांसह थेट सरपंचांची निवड करणाऱ्या या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊ लागला आहे.

कोल्हापुर जिल्ह्यात पहिला निकाल हाती आला असून कागल तालुक्यातील हसन मुश्रीफ गटाला पहिला धक्का बसला होता. बामणी ग्रामपंचायतीमध्ये घाडगेंच्या राजे गटाने बाजी मारली होती. ग्राम पंचायतमध्ये भल्या भल्यांना सत्ता राखता आलेली नाहीय.

गुजरात निवडणुकीच्या विजयाचे श्रेय मिळालेले प्रदेशाध्यक्ष पाटील यांना त्यांची ग्राम पंचायत राखता आलेली नाही. बाळासाहेब थोरातांच्या ग्राम पंचायतीत देखील विखे पाटलांनी सरपंच पद जिंकले आहे. यामुळे स्थानिक राजकारण जरी असले तरी धक्कादायक निकाल लागत आहेत.

दुपारपर्यंत लागलेल्या निकालांनुसार भाजपा आणि शिंदे गट ५१३ ग्राम पंचायतींमध्ये आघाडीवर होता. तर मविआ ४४० ग्रा. पंचायतवर आघाडी मिळाली होती. तर इतर आघाड्या २१८ ग्राम पंचायतींमध्ये पुढे होत्या. परंतू आता हे चित्र पार पालटले आहे. सरपंच पदाचेही चित्र असेच पालटले असून भाजपा-शिंदे आघाडीवर मविआने कडी केली आहे.

आतापर्यंत लागलेल्या निकालानुसार भाजपाला ७१७ ग्रा. पंचायतींमध्ये यश मिळाले आहे. तर शिंदे गटाला ४६३ ग्राम पंचायतींमध्ये विजय मिळाला आहे. इतरांच्या ५१४ जागा विचारात घेतल्या नाहीत तर भाजपा आणि शिंदे गटाच्या मिळून ११८० ग्राम पंचायती होतात.

तर राष्ट्रवादी काँग्रेसला ५१० ग्राम पंचायतींमध्ये विजय मिळाला आहे. काँग्रेसला ३५७ ग्राम पंचायतींमध्ये यश मिळाले असून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला ३३७ जागांवर यश मिळाले आहे. इतरांच्या ५१४ जागा विचारात घेतल्या नाहीत तर महा विकास आघाडीला १२०४ ग्राम पंचायतींमध्ये यश मिळाले आहे.

म्हणजेच भाजपा शिंदे गटाच्या आघाडीपेक्षा मविआला २४ जास्त ग्राम पंचायती मिळाल्या आहेत. सरपंच पदाची आकडेवारी तर त्याहून धक्कादायक आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने अचानक मोठी झेप घेतल्याने भाजपा-शिंदे गटात खळबळ उडणार आहे.

पक्षांचा विचार केला तर सरपंचपदासाठी सकाळपासून भाजपाच आघाडीवर आहे. परंतू जर दोन्ही आघाड्यांचा विचार केला तर भाजपा-शिंदे गट पिछाडीवर गेला आहे. यंदाही थेट सरपंच निवडले जात आहेत.

यामध्ये भाजपाला २९७ ग्राम पंचायतींचे नेतृत्व मिळाले आहे. तर शिंदे गटाला आतापर्यंतच्या निकालात २०१ जागांवर सरपंचपदी यश आले आहे. इतरांच्या १७१ सरपंचपदांचा विचार न केल्यास ४९८ सरपंच पदे मिळाली आहेत.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने मोठी झेप घेतली आहे. काँग्रेसनेही आपला स्ट्राईक रेट तसाच ठेवला आहे. राष्ट्रवादीला २३८ सरपंचपदे, काँग्रेसला १७६ तर ठाकरे गटाला १६३ ग्राम पंचायतींमध्ये सरपंच पद मिळाले आहे. इतरांचा आकडा बाजुला ठेवला तर मविआकडे ५७७ ग्रा. पं.ती सरपंचपदे गेली आहेत.

म्हणजेच भाजपा शिंदे गटाच्या आघाडीपेक्षा मविआला ७९ जादा सरपंचपदे मिळाली आहेत. तर जिंकलेल्या ग्राम पंचायती आणि मिळालेली सरपंच पदे यात काँग्रेसचा आकडा आश्चर्यकारक आहे. काँग्रेसला ३५७ ग्राम पंचायतींवर यश मिळाले असून त्यापैकी १७६ ठिकाणी सरपंच झाले आहेत.