कर्ज काढून बांधलेली १ कोटी ८० लाखांची बोट समुद्रात जळून खाक, किनाऱ्यावर आणेपर्यंत उरला सांगाडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 19:10 IST2025-02-28T19:06:11+5:302025-02-28T19:10:27+5:30

शुक्रवारी पहाटे अलिबाग लगतच्या अरबी समुद्रात मच्छिमार बोटीला आग लागल्याची घटना घडली. या घटनेत ही बोट पूर्णतः भस्मसात झाली. या बोटीवर १८ खलाशी होते.

खोल समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटीचे आगीनंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आग लागल्यानंतर भस्मसात झालेल्या बोटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दुर्घटनेत ९० टक्के बोट जळून खाक झाली

या बोटीत असलेल्या १८ खलाशांचा भारतीय तटरक्षक दलाने जीव वाचवला. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र बोट किनाऱ्यापर्यंत आणेपर्यंत तिचा सांगाडा उरला होता.

शुक्रवारी पहाटे समुद्रातून मच्छीमारी करण्यासाठी एकवीरा माऊली ही बोट गेली होती. बोटीवरील खलाशी परतीचा प्रवास करत होते. मात्र बोटीत अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली.

आग इतकी भयावह होती की बोट पूर्णपणे जळून खाक झाली. बोटीतील खुलाशांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही.

आग वाढताच खलाशांनी समुद्रात उड्या घेतल्या. त्यानंतर कोस्ट गार्डच्या मदतीने खुलाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीमुळे बोटीतील जाळी, मच्छिमारासाठी लागणारे अवजारे जळून खाक झाली.

समुद्रातील बोट किनार्‍यावर आणण्यासाठी सर्व मच्छीमार प्रयत्न करत होते. साधारण सहा तासांच्या प्रयत्नानंतर बोट किनाऱ्यावर आणण्यात यश आलं. मात्र तोपर्यंत बोट पूर्ण जळून खाक झाली होती. बोटीचा पाया फक्त राहिला.

बोट मालकाने बँकेतून, सोने तारण ठेवून, मच्छीमार सोसायटीमधून कर्ज घेतलं होतं. सगळी रक्कम एकत्र करुन ही बोट बनवली होती. मात्र या दुर्घटनेनंतर त्यांच्या सगळ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

१ कोटी ८० लाख रुपये खर्चून ही बोट तयार करण्यात आली होती. मात्र आता त्यापैकी काहीच हातात उरलं नाही. एकतर अगोदर आम्ही कर्जबाजारी आहोत, त्यात पुन्हा आता आमच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे, अशी प्रतिक्रिया बोटीचे मालक राकेश गण यांनी दिली.