Satbara: शेतकऱ्यांचे हेलपाटे टळणार, एकाच छताखाली सातबारा अन् नमुना ८ मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 16:29 IST2026-03-12T16:23:31+5:302026-03-12T16:29:38+5:30
'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' राज्यात सर्व जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणार आहे. या विशेष अभियानांतर्गत एकाच छताखाली नागरिकांना सातबारा अन् नमुना ८ अ यासारख्या १५ सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान - नागरिकांना जलदपणे महसूलच्या सेवांचा लाभ व्हावा, त्यांची पायपीट, गैरसोय टळावी, हा या अभियानाचा उद्देश आहे. महसूल विभाग आणि जनतेमध्ये या अभियानाद्वारे एक चांगला सेतू तयार होणार आहे. पंधरा महसूल सेवा सर्वसामान्यांना एकाचवेळी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

एकाच छताखाली मिळताहेत सेवा - सातबारा दुरुस्ती, डिजिटल सातबारा प्रमाणपत्र, फेरफार अर्ज निकाली काढणे, नमुना ८ अ उतारा उपलब्ध करून देणे, विविध प्रमाणपत्रांचे वितरण करणे, एक खिडकी व्यवस्थेंतर्गत अर्ज निकाली काढणे, भूसंपादनप्रकरणी गाव दफ्तर अद्ययावत करणे यासारख्या विविध १५ प्रकारच्या सेवा तालुकापातळीवर मंडळनिहाय उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जिल्ह्यात पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला असून, पुढील चार टप्पे अजून शिल्लक आहेत.

महसूलविषयक तक्रारींचा जागेवर निपटारा - महसूलविषयक प्राप्त झालेल्या तक्रार अर्जाचा विषय लक्षात घेत तातडीने या अभियानांतर्गत शिबिरामध्ये जागेवरच संबंधित शाखेच्या अधिकाऱ्यांकडून निपटारा करण्यात येत आहे. यामुळे सरकारी काम जलदपणे मार्गी लागण्यास मदत होत आहे.

विविध प्रमाणपत्रांचेही वाटप - नागरिकांना विशेषतः शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी लागणारे विविध दाखले, प्रमाणपत्रांचेसुद्धा वाटप करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

















