शिवसेना संपवण्याचं शरद पवारांचं कटकारस्थान?; बंडखोर आमदारांनी घटनाक्रम सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 04:18 PM2022-06-27T16:18:51+5:302022-06-27T16:23:51+5:30

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला असून शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ३९ आमदार आणि १२ अपक्ष आमदारांनी मविआ सरकारचा पाठिंबा काढण्याचा पवित्रा घेतला आहे.

त्यात आता बंडखोर आमदारांनी पत्रक काढत शरद पवारांसह संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. आज जी परिस्थिती त्याची पाळेमुळे जुनी आहेत. शिवसेना आणि भाजपाची युती अतिशय जुनी, २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक आम्ही एकत्रित लढलो. शिवसेनेची ताकद होतीच पण नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि उद्धव ठाकरे यांचे परिश्रम यामुळे शिवसेनेचे १८ खासदार विजयी झाले.

विधानसभा निवडणूक सुद्धा आम्ही एकत्रित लढवण्याचे ठरवले. त्यावेळी युवानेते आदित्यजी यांनी मिशन १५१ राबवले. अशात भाजपाने १४० जागांचा प्रस्ताव दिला होता. पण वाटाघाटीअंती भाजपाने १२७ जागा घ्यायाच्या आणि शिवसेनेला १४७ जागा द्यायच्या यावर शिक्कामोर्तब झाले. शिवसेनेची ताकद होतीच पण ४ जागांचा आग्रह काही सोडण्यात आला नाही. शेवटी जे व्हायला नको तेच झाले.

दीर्घकाळाची युती तुटली आणि आम्हाला वेगवेगळ्या निवडणुका लढाव्या लागल्या. २०१४ ची निवडणूक असो की २०१९ नंतर राज्यात उद्बवलेली परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत की, भाजपाचे केंद्रीय अथवा राज्यस्तरावरील नेते अगदी कुणीही आमचे आदर्श वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही.

जेव्हापासून संजय राऊत यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका करण्याचा विषारी क्रम प्रारंभ केला. म्हणजे केंद्रात मंत्रिपदे घ्यायची, मोदींच्या मंत्रिमंडळात राहायचे, राज्यातील सरकारमधील घटकपक्षही राहायचे आणि मोदींवर जहरी टीका करायची यातून दोन पक्षांतील दरी वाढवण्याचे काम प्रारंभ करण्यात आले.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि देशातील अन्य विरोधी पक्ष सुद्धा जी भाषा वापरत नाही ती भाषा आमच्या संजय राऊतांच्या तोंडी कायम असते. राजकारणाची दिशा बदलत होती. हे राजकारण शिवसेनेच्या वाढीसाठी, हिंदूत्त्वाच्या विचारवाढीसाठी असते, तर ते समजूनही घेता आले असते. हे सत्तेचे राजकारण असते तर तेही एकवेळ समजून घेतले गेले असते. पण, सत्ता कशाच्या बळावर तर स्वत:ला संपवून? हे आम्हाला कदापिही मान्य नाही

थोडक्यात काय तर सत्तेतही आम्हीच होतो आणि विरोधी पक्षातही आम्हीच! एव्हाना या राजकारणाचा मुख्य बिंदू लक्षात यायला लागला होता. २०१९ जसजसे जवळ येत गेले, तसा हा विखार आणखी वाढत गेला.

विधानसभा निवडणूक झाली आणि आमच्या युतीला बहुमत मिळाले. सरकारचे गठन ही औपचारिकता मात्र शिल्लक राहिली असताना अचानक हेच संजय राऊत पुन्हा सक्रिय झाले. त्यांच्या या सक्रियतेला शरद पवार साहेबांचे आशिर्वाद होतेच.

जनतेने जनादेश शिवसेना-भाजपा युतीला दिला होता. पण ज्यांनी हिंदूत्त्वाचा सातत्याने अपमान केला, ज्यांच्याविरोधात हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आजन्म लढले, ज्यांनी शिवसेना फोडली आणि नेते आपल्या पक्षात घेतले अशांसोबत बसणे आम्हाला तेव्हाही मान्य नव्हते. पण, पक्षप्रमुख जे सांगतील ते आम्ही निमूटपणे करीत राहिलो.

हा लढा सत्तेसाठी नाही, सत्तेत तर आम्ही होतोच. पण, संजय राऊतांच्या सल्ल्याने अख्खा पक्ष जर शरद पवारांच्या दावणीला बांधायचा असेल तर मग शिवसेनेचे अस्तित्त्व काय उरेल? कलम ३७० च्यावेळी उघडपणे आमच्या नेत्यांना बोलता येऊ नये, इतकी वाईट अवस्था?

सोनिया गांधी आणि शरद पवारांना खुश करण्याच्या नादात आम्ही आमचा आत्मसन्मान घालवायचा का? सर्व महत्त्वाची खाती काँग्रेस, राष्ट्रवादीला देऊन टाकायची आणि मुख्यमंत्रीपद तेवढे ठेवायचे. दाऊदशी संबंध असल्याचा आरोप झालेल्या मंत्र्याचा बचाव करायचा तरी कसा?

राज्यसभा निवडणुकीतही या पक्षांनी शिवसेनेच्याच उमेदवाराला हरवायचे. मग करायचे तरी काय? नुसतं सहन करीत बसायचे? दुर्दैव म्हणजे जे कधीही जनतेतून निवडून आले नाहीत, ते संजय राऊत पक्ष संपवायला निघाले आहेत. संजय राऊत हेच शरद पवारांच्या गळ्यातील ताईत आहेत.

उद्धवजी आणि आमच्यात दरी वाढविण्याचे पाप संजय राऊतांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी बंदूक चालवायची, खांदा संजय राऊतांचा वापरायचा आणि त्यातून मारले जाणार कोण तर पक्षाचे शत्रू नव्हे तर आपणच. हे आम्हाला मान्य नाही. म्हणूनच आमचा हा लढा शिवसेनेचा आहे.