शेवटच्या क्षणी काय घडलं? अजित पवारांच्या विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' ताब्यात; इतका सुरक्षित कसा राहतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 13:50 IST2026-01-29T13:39:50+5:302026-01-29T13:50:54+5:30

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असतानाच, आता या भीषण दुर्घटनेच्या तपासाला वेग आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. हा अपघात नेमका कसा झाला, तांत्रिक बिघाड होता की मानवी चूक, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता सर्वात मोठा पुरावा प्रशासनाच्या हाती लागला आहे.

तपास यंत्रणांनी दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स यशस्वीरीत्या हस्तगत केला असून, आता यातून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. कोणताही विमान अपघात झाला की तपास यंत्रणा सर्वात आधी 'ब्लॅक बॉक्स'चा शोध घेतात. हा एक असा मजबूत रेकॉर्डर असतो, जो विमानाचा चक्काचूर झाला किंवा विमानाने पेट घेतला तरी सुरक्षित राहतो.

अजित पवार यांच्या निधनानंतर सुरक्षा यंत्रणांनी ढिगाऱ्यातून हा नारंगी रंगाचा बॉक्स बाहेर काढला असून तो आता लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवला जाणार आहे.या उपकरणात दोन महत्त्वाचे रेकॉर्डर्स असतात, जे अपघाताचा छडा लावण्यास मदत करतात.

फ्लाईट डेटा रिकॉर्डरमध्ये विमानाची तांत्रिक माहिती नोंदवलेली असते. विमान किती उंचीवर होते, त्याचा वेग किती होता आणि विमानात इंधन किती शिल्लक होते, याची इत्यंभूत माहिती यात मिळते. तर कॉकपिट व्हॉईस रिकॉर्डर यामध्ये वैमानिकांमधील शेवटचा संवाद रेकॉर्ड असतो. अपघातापूर्वी वैमानिक एकमेकांशी काय बोलले? त्यांना काही धोक्याचा इशारा मिळाला होता का? कॉकपिटमध्ये कोणते अलार्म वाजत होते? या सर्व आवाजांची नोंद यात असते.

नावावरून हा बॉक्स काळा वाटत असला तरी तो प्रत्यक्षात भडक नारंगी रंगाचा असतो. जेणेकरून विमानाचा ढिगारा, जंगल किंवा समुद्राच्या तळाशी तो सहज दिसून यावा. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा ही यंत्रे नवीन होती, तेव्हा ती इलेक्ट्रॉनिक उपकरणे काळ्या रंगाच्या बॉक्समध्ये बंद असायची. त्यामुळे त्यांना 'ब्लॅक बॉक्स' म्हटले जाऊ लागले.

विमान जळून खाक झाले असले तरी, हा बॉक्स अशा धातूपासून बनवलेला असतो जो ११०० अंश सेल्सिअस तापमान एक तासापर्यंत सहन करू शकतो. हे बॉक्स 'स्टेनलेस स्टील' किंवा 'टायटॅनियम'पासून बनवलेले असतात, जेणेकरून ते प्रचंड उष्णता आणि समुद्राच्या तळाचा दाब सहन करू शकतील.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आता या ब्लॅक बॉक्समधील डेटाचे विश्लेषण करेल. लँडिंगच्या वेळी वैमानिकाने 'गो-अराउंड' का घेतला आणि दुसऱ्या प्रयत्नात नक्की काय घडले, याचा 'मिनिट-टू-मिनिट' रिपोर्ट लवकरच समोर येईल. हा रिपोर्ट सार्वजनिक झाल्यानंतरच अजित पवारांच्या विमानाला लागलेल्या आगीचे अधिकृत कारण सर्वांना समजेल.