महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 10:41 IST
1 / 10राज्यातील पर्यटन स्थळांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) ‘तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे’ हा उपक्रम राबवला जात आहे. 2 / 10या उपक्रमाअंतर्गत सर्वोत्तम छायाचित्राला पाच लाखांचे प्रथम पारितोषक देण्यात येईल. पर्यटन स्थळांचे सौंदर्य, वैविध्य, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांची ओळख वाढवणे हा त्यामागील उद्देश आहे. 3 / 10निवडक छायाचित्रे, ‘फोटो ऑफ द डे’, ‘फोटो ऑफ दी मन्थ’, ‘फोटो ऑफ द इअर’ या श्रेणीमध्ये विभागणी करून समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येतील. ‘फोटो ऑफ द इअर’ या श्रेणींसाठी नामवंत पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या समितीकडून छायाचित्र निवडण्यात येतील. 4 / 10प्रथम विजेत्यास पाच लाख रुपये, प्रथम उपविजेत्यास एक लाख रुपये, द्वितीय उपविजेत्यास ७५ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. फोटोसाठी निकष आणि शर्तीही ठेवण्यात आल्या आहेत. 5 / 10फोटो स्वतः काढलेला असावा. उच्च दर्जा, मौलिकता व स्थानिक वैशिष्ट्यांचे प्रतिबिंब महत्त्वाचे ठरेल. बदल केलेले अथवा एडिटेड फोटो ग्राह्य धरले जाणार नाहीत. 6 / 10फोटोंची निवड करताना तज्ज्ञ समिती छायाचित्रांचा दर्जा व वैशिष्ट्ये तपासून विजेते निवडेल. त्याचसोबत सार्वजनिक मतदानाचाही विचार होईल. या उपक्रमातून महाराष्ट्राच्या पर्यटनाची एक नवी ओळख तयार होईल. 7 / 10प्रवाशांनी टिपलेली छायाचित्रे हेच खरी जाहिरात माध्यम ठरणार आहेत, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, इच्छुकांना ‘एमटीडीसी’च्या अधिकृत संकेतस्थळावर छायाचित्रे अपलोड करावी लागतील.8 / 10रिसॉर्टमध्ये विनामूल्य वास्तव्य - ‘फोटो ऑफ दि मन्थ’च्या विजेत्यांना दोन जणांसाठी तीन दिवस, दोन रात्री ‘एमटीडीसी’च्या रिसॉर्टमध्ये विनामूल्य राहता येईल. ‘फोटो ऑफ द डे’, ‘फोटो ऑफ द मन्थ’ची निवड समाजमाध्यमावरून मतदानावर आधारित निकषानुसार केली जाईल.9 / 10काय आहे योजना? - स्वतः टिपलेली छायाचित्रे पाठवावी लागतील. त्या माध्यमातून पर्यटनस्थळांचा प्रचार, प्रसिद्धी केली जाईल. निवडक छायाचित्रांचा वापर पर्यटन प्रसिद्धीसाठी केला जाईल. विविध श्रेणींत फोटोंची निवड केली जाईल. 10 / 10त्यामध्ये किल्ले, समुद्रकिनारे, हिल स्टेशन, धार्मिक स्थळे आदी विभागानुसार फोटो स्वीकारले जातील. प्रत्येकी ५० हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.