मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 20:26 IST2026-01-01T20:20:08+5:302026-01-01T20:26:52+5:30
Devendra Fadnavis Visit Mumbai Siddhivinayak Temple: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराचे दर्शन घेतले.

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा धुराळा उडू लागला असून राजकारण कमालीचे तापले आहे. एकीकडे उमेदवारी अर्जांच्या छाननीची प्रक्रिया वेगाने सुरू असताना, दुसरीकडे भाजपने निवडणुकीपूर्वीच विजयाचा सपाटा लावला आहे.

राज्यातील अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले.

उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि छाननी सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धिविनायक मंदिरात हजेरी लावली. त्यांच्यासोबत भाजपचे अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीला आणि विशेषतः भाजपला घवघवीत यश मिळावे, यासाठी त्यांनी गणरायाकडे साकडे घातले.

कल्याण-डोंबिवली येथे आसावरी केदार नवरे आणि रेखा चौधरी या दोन उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवत पक्षाचे खाते उघडले. धुळे आणि पनवेल या महापालिकांमध्येही भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याच्या बातम्या आहेत.भिवंडी महापालिकेतही एका उमेदवाराचा बिनविरोध विजय झाला आहे. आतापर्यंत राज्यातील विविध पालिकांत मिळून भाजपचे सुमारे ८ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याचे समजते.

राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. मतदानापूर्वीच मिळालेल्या या बिनविरोध विजयामुळे भाजपचे पारडे जड मानले जात आहे.

















