Walmik Karad: वाल्मीक कराड पुरता अडकला; CIDच्या हाती महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग, गुन्ह्याची लवकरच उकल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 12:36 IST2025-01-10T12:29:43+5:302025-01-10T12:36:33+5:30

Beed Crime: मागणी पूर्ण न केल्यास हातपाय तोडण्यासह कायमची वाट लावीन, अशी धमकी वाल्मीक कराड याने अधिकाऱ्याला दिली होती.

बीडमधील आवादा या पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला वाल्मीक कराड हा सध्या पोलीस कोठडीत आहे. अनेक दिवस फरार असलेला वाल्मीक कराड काही दिवसांपूर्वी सीआयडीला शरण आला.

कोर्टाने १५ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावल्यानंतर सध्या वाल्मीकची कसून चौकशी सुरू आहे.

या प्रकरणातील दुसरा आरोपी विष्णू चाटे हादेखील पोलीस कोठडीत आहे. विष्णू चाटेच्या मोबाइलवरून वाल्मीकने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. मागणी पूर्ण न केल्यास हातपाय तोडण्यासह कायमची वाट लावीन, अशी धमकी वाल्मीक कराड याने अधिकाऱ्याला दिली होती.

कराड याच्या संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंग आता सीआयडीच्या हाती लागले असून, आवाजाची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कराडच्या अडचणींत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसत आहे.

सुनील केदू शिंदे हे आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याकडे केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पाची मांडणी व उभारणीचे काम आहे. याच शिंदे यांना धमकी देऊन कराडने खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

२९ नोव्हेंबर रोजी शिंदे यांच्या मोबाइलवर विष्णू चाटे याने फोन केला. वाल्मीक अण्णा बोलणार आहेत, असे सांगितले. ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने सांगितले आहे, त्या परिस्थितीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, काम चालू केले तर याद राखा', असे म्हणून काम बंद करण्याची धमकी दिली.

कराडने धमकी दिली त्याच दिवशी घुले कार्यालयात आला. 'काम बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडू', अशी धमकी दिली. 'काम चालू ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपये द्या', असे सांगितले होते. याचे सर्व कॉल रेकॉर्डिंग शिंदे यांच्या मोबाइलमध्ये झाले आहे. त्यावरून गुन्हा दाखल झाला होता.

हेच रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागले आहे. तो आवाज कराड, चाटे यांचाच आहे का? यासाठी व्हॉइस सॅम्पल तपासणीचे काम सुरू आहे.