पासपोर्टबाबत मोठा बदल ! किती येणार खर्च, किती दिवस लागणार ? वाचा संपूर्ण माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 19:10 IST2026-02-06T18:53:08+5:302026-02-06T19:10:53+5:30
पूर्वी पासपोर्ट काढण्यासाठी मोठ्या शहरात वारंवार फेऱ्या माराव्या लागत असत. मात्र, आता जिल्हास्तरावर पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली आहे. पोलिस पडताळणीची प्रक्रियाही आता जलद झाली असल्याने पासपोर्ट मिळण्याचा मार्ग सुकर झाला असल्याने आता परदेशवारी शक्य होत आहे.

कुठे आणि कसा काढायचा पासपोर्ट ? - पासपोर्टसाठी 'पासपोर्ट सेवा' या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी लागते. जिल्हा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रात अपॉइंटमेंट घेऊन बायोमेट्रिक व कागदपत्र तपासणी पूर्ण करावी लागते. ऑनलाइन अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे पोस्ट कार्यालयात सादर करावी लागतात. या कागदपत्रांची पडताळणी केली जाते.

ही कागदपत्रे आवश्यक - ओळखीचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला किंवा १० वीची सनद, पत्त्याचा पुरावा म्हणून लाइट बिल, बँक पासबुक किंवा रेशनकार्ड आवश्यक आहेत.

खर्च किती येतो? - साधारण पासपोर्टसाठी १ हजार ५०० रुपये शुल्क आकारले जाते. तर लहान मुलांसाठी किंवा तत्काळ सुविधेद्वारे पासपोर्ट हवा असल्यास २ हजार रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागतात.

परदेशी जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले - उच्चशिक्षणासाठी अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा, तसेच मध्य आशियातील विविध देशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. तसेच अनेक तरुण आयटी क्षेत्रात आणि व्यापाराच्या निमित्ताने परदेशवारी करत आहेत.

ऑनलाइन सुविधा काय ? - आता पासपोर्ट अर्जाची संपूर्ण प्रक्रिया एम पासपोर्टसेवा या मोबाइल अॅपवरूनही करता येते. फी भरणे, कागदपत्रे अपलोड करणे आणि आपल्या अर्जाची स्थिती तपासणे या सर्व सेवा आता ऑनलाइन उपलब्ध आहेत.

















