स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:02 IST2025-09-09T12:56:33+5:302025-09-09T13:02:36+5:30

आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात शिंदेसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. अलीकडेच उल्हासनगर येथे शिंदेसेना आणि ओमी कलानी यांनी युतीची घोषणा केली. मात्र शिंदेंनी टाकलेला हा डाव भाजपासाठी धक्का मानला जातो.
गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे एकूण २५ नगरसेवक निवडून आले होते. ५ उमेदवार अगदी कमी मतांनी पराभूत झाले. इथले २ नगरसेवक सोडले तर बाकी शिंदेसेनेसोबत आहेत. त्यात सिंधी पट्ट्यात कलानी यांचे वर्चस्व असून त्यांचे २१ नगरसेवक गेल्यावेळी निवडून आले होते.
ओमी कलानी यांच्या २१ नगरसेवकांपैकी ५ समर्थक नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे ओमी टीमने पक्षाला अजून गळती लागू नये यासाठी घाईघाईने शिंदेसेनेसोबत युती केल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
शिंदेसेना आणि टीम ओमी कलानी यांच्या युतीमुळे भाजपाला शह देण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर केला जात असल्याचे बोलले जाते. परंतु स्थानिक पातळीवर ही युती झाली असली तरी भाजपा आणि शिंदेसेना हे महायुतीचा भाग आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय अंतिम असल्याचे शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.
भाजपानेही उल्हासनगर येथे महापालिका निवडणुकीची तयारी केली आहे. या विभागात भाजपाचा आमदार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराने ओमी कलानी यांना पराभूत केले होते. मात्र आता ओमी कलानी यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. येत्या निवडणुकीत शिंदेसेनेसोबत युतीचा निर्णय जाहीर केला आहे.
कलानी यांच्या पाठोपाठ खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्थानिक साई पक्षासोबतही संबंध ठेवले आहेत. गेल्या निवडणुकीत साई पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले होते. यापूर्वी त्यांनी महापालिकेत सत्तेची चावी त्यांच्याकडे ठेवत पक्षाला महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आदी महत्वाची पदे घेतली. साई पक्ष शिंदेसेनेसोबत असल्याचं उघड आहे.
उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. १९९० मध्ये पप्पू कलानी इथून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. त्यानंतर १९९९ आणि त्यापुढची निवडणूक ते अपक्ष लढले आणि जिंकले. २००४ च्या निवडणुकीत आरपीआयकडून ते आमदार बनले. परंतु २००९ मध्ये पप्पू कलानी यांना पराभव सहन करावा लागला. २०१९ आणि २०२४ साली भाजपाने ही जागा त्यांच्या ताब्यात ठेवली.
ठाणे जिल्ह्यात केवळ उल्हासनगरच नव्हे तर इतर ठिकाणीही भाजपा आणि शिंदेसेनेत कुरघोडी पाहायला मिळते. ठाणे जिल्ह्यात भाजपाचे मंत्री गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील छुपा संघर्ष अनेकांना ठाऊक आहे. ठाण्यात शिंदेसेनेची पकड ढिली करण्यासाठी भाजपाकडून जनता दरबार घेतला जातो. म्हस्के आणि नाईक यांच्यातील आरोप प्रत्यारोपही मागील काळात घडलेले आहेत.
ठाणे जिल्ह्यात ठाणे महापालिकेसोबत इतर ५ महापालिका आहेत. त्यात काही ठिकाणी शिंदेंची पकड मजबूत आहे तर काही ठिकाणी भाजपा वरचढ आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीतील भाजपा-शिंदेसेनेकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत.
नुकतेच गणेश नाईक यांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंना टोला लगावला होता. स्थानिक पातळीवर एखाद्या पक्षास महायुतीमध्ये लढणे अन्यायकारक वाटत असेल तर त्या पक्षाला वेगळे लढण्याची मुभा दिली पाहिजे असं गणेश नाईक यांनी म्हटलं होते.