"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:41 IST2025-07-17T13:35:10+5:302025-07-17T13:41:20+5:30
Ambadas Danve Balasaheb Thackeray: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी निष्ठेच्या मुद्द्यावर बोलताना बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या भेटीचा किस्सा सांगितला.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी संपत आहे. त्यानिमित्ताने त्यांना विधान परिषदेत निरोप देण्यात आला. निरोपाच्या भाषणात अंबादास दानवे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि निष्ठेबद्दल एक खास आठवण सांगितली.
अंबादास दानवे निरोपाच्या भाषणात म्हणाले, "मी कार्यकर्ता आहे. शिवसैनिक आहे. मी सगळ्या पदावर आहे, पण मी आता शिवसेनेचा नेता सुद्धा झालो, हे सगळे जण विसरले. शिवसेनेत पक्षप्रमुखानंतर नेता सर्वात महत्त्वाचा असतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंमुळे मला ती संधी फार कमी वयात मिळाली."
शिवसैनिक म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीचा किस्सा दानवेंनी सांगितला. "शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला २००० साली बोलावले होते. शहरप्रमुख ठरवायचा होता. तेव्हा शिवसेना प्रमुख मुलाखत घेऊन नियुक्ती करायचे. माझी २००४ मध्ये त्यांनी मुलाखत घेऊनच नियुक्ती केली आहे. दोघांना शहर प्रमुख करण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी बोलावले होते."
"आम्ही गेल्याबरोबर शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला विचारले, तुम्ही खैरेंची की रावतेंचे? आम्ही घाबरलो. आम्ही म्हणालो, आम्ही तुमचे आहोत", असे दानवे आपल्या भाषणात म्हणाले.
"बाळासाहेबांनी त्यावेळी दिलेले उत्तर आजही माझ्यावर मनावर कोरलेले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे म्हणाले की, 'माझे कशासाठी राहता? उद्या मी शिवसेना सोडली तर?' मी शिवसेना सोडली, तरी तुम्ही शिवसेना सोडू नका."
"तुम्ही माझेही राहू नका. तुम्ही शिवसेनेचे राहा. अशापद्धतीने बाळासाहेबांनी निष्ठा रुजवलेली आहे आणि या निष्ठेने आम्ही काम करतोय", असा किस्सा अंबादास दानवेंनी सभागृहात सांगितला.
निरोपाच्या भाषणात अंबादास दानवे यांनी सांगितले की, "माझ्याकडे अजून ४४ दिवस आहेत. ४४ दिवसांत दुनिया इकडची तिकडे होऊ शकते. शिवसेनाप्रमुखांनी तलवार आम्हाला अन्यायाविरोधात उचलण्यासाठी शिकवली. ही खुर्ची नाही जबाबदारी आहे. जे जे कार्य केले आहे ते महाराष्ट्राच्या हिताच्या विचाराने आणि शिवसेनाप्रमुखांच्या विचाराने पूर्ण झाले आहे", अशा भावना अंबादास दानवे यांनी व्यक्त केल्या.