Ajit Pawar's Life in Photos: बाहेर कडक शिस्त, घरात मायाळू बाप! लहानांसोबत खेळणे, मुलांचा अभ्यास; अजित पवारांचा व्हिडीओ शेअर करत जय पवार भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 10:58 IST2026-02-25T10:07:18+5:302026-02-25T10:58:07+5:30

Ajit Pawar's Life in Photos: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांचे निधन होऊन महिना होत आला. सोशल मीडियावर आजही त्यांच्या आठवणी शेअर केल्या जात आहेत.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात मृत्यू झाला.२९ जानेवारी २०२६ रोजी त्यांच्या पार्थिवावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठान कॉलेजच्या प्रांगणामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून समर्थकांनी बारामतीत गर्दी केली होती. आजही अजितदादांच्या आठवणी आजही शेअर केल्या जात आहेत, अजित पवारांचे धाकटे सुपूत्र जय पवार यांनी अजित पवारांचे जुने फोटो एकत्र केलेला एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये अजित पवार यांचे जुने फोटो आहेत. आपल्या कुटुंबासोबत घरी घालवलेला वेळ, बाहिणींसोबतच्या आठवणी. जय पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार या सगळ्यांसोबतचे ते काढलेले फोटो आहेत. हा व्हिडीओ शेअर करत जय पवार भावुक झाल्याचे दिसत आहेत.

अजित पवार यांच्या अंत्यविधीच्या दिवसाचे क्षण या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहताना अनेक जण भावुक झाल्याचे दिसत आहे.

पार्थ पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अजित पवार यांचे अनेक जुने फोटो आहेत. काही फोटो आजपर्यंत कधीच न पाहिलेले फोटो आहेत.हा व्हिडीओ पाहताना डोळे नकळत पाणावतात.

या व्हिडीओमध्ये एक भयाण शांतता, हजारो चेहऱ्यांवर दिसणारी वेदना-दुःख, कार्यकर्त्यांचे ओले डोळे आणि मनात दाटून आलेली पोकळी जाणवते. या फोटोमध्ये अजितदादा घरी लहान मुलांचा अभ्यास घेताना दिसतात.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू असा अपघातामध्ये कधी होईल असे कोणाला वाटले नव्हते. अजितदादांच्या निधनामुळे राज्यात अजूनही शांतता आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे लीअरजेट ४५ हे खासगी विमान गेल्या महिन्यात २८ जानेवारी रोजी बारामती जवळ कोसळले होते. या अपघातानंतर आमदार रोहित पवार यांनी विमान कंपनी विरोधात आरोप केले आहेत . यानंतर 'डीजीसीए'ने केलेल्या विशेष सुरक्षा लेखापरीक्षणात विमानाची उड्डाण तांत्रिक क्षमता, हवाई सुरक्षा आणि उड्डाण कार्यप्रणाली मंजूर प्रक्रियांमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळल्या आहेत.

दरम्यान, आता डीजीसीएने कारवाई केली आहे. डीजीसीएने मेसर्स व्हीएसआर वेंचर्स प्राय. लिमिटेड या विमान कंपनीच्या व्हीटी-व्हीआरए, व्हीटी-व्हीआरएस, व्हीटी-व्हीआरव्ही आणि व्हीटी-टीआरआय या चार विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातली.

डीजीसीएने घातलेली ही बंदी लीअरजेट ४०/४५ जातीची विमाने उड्डाण योग्यतेचे निकष पूर्ण होईपर्यंत राहणार आहे. या कंपनीला कारणे द्यायला सांगण्यात आले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एका खळबळजनक ट्विटद्वारे VSR विमान कंपनीच्या कागदपत्रांमध्ये मोठी हेराफेरी होत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. विमानाचे तब्बल ३००० तासांचे रेकॉर्ड्स उपलब्ध नसल्याचा दावा करत त्यांनी तपासाच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "VSR कंपनीकडे विमानाचा ५००० तासांचा प्रवास झाला असताना केवळ १८०० ते २००० तासांचाच रेकॉर्ड उपलब्ध आहे. उर्वरित ३००० तासांची माहितीच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे." या मिसिंग रेकॉर्ड्समध्ये कंपनीला फेरफार आणि बनवाबनवी करता यावी, यासाठीच जाणूनबुजून चौकशी लांबवली जात आहे का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.