फुले उधळून ढोल ताशांच्या गजरात 'लक्ष्मी'चं स्वागत; मुलगी झाल्याचा आनंद गगनात मावेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 16:58 IST2023-09-04T16:56:11+5:302023-09-04T16:58:30+5:30
मध्य प्रदेशातील जबलपूरमधील एका घटनेनं सर्वांची मनं जिंकली आहेत.

मध्य प्रदेशातील जबलपूरमधील एका घटनेनं सर्वांची मनं जिंकली आहेत. इथे घरी नव्या पाहुण्याचं आगमनं झालेल्या लक्ष्मीचं दणक्यात स्वागत करण्यात आलं. घरी चिमुकलीचं आगमन होताच कुटुंबीयांचा आनंद गगनात मावत नव्हता. मुलगी झाल्याच्या आनंदात नातेवाईकांनी मिठाई तर वाटलीच शिवाय धुमधडाक्यात तिचं स्वागत केलं.

नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी घराला सजावट करण्यात आली. ज्या वाटेने आई आणि मुलगी घरात येत होती त्या मार्गावर फुले पसरली. ढोल-ताशांच्या तालावर कुटुंबीयांनी नातेवाईक आणि शेजाऱ्यांसोबत आनंदोत्सव साजरा केला.

इतकंच नाही तर मुलगी घरात आल्यानंतर तिला नोटांच्या बेडवर झोपवण्यात आलं. त्यांना फक्त मुलगीच हवी होती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

जबलपूर येथील पराशर कुटुंबात या मुलीचा जन्म झाला. जिल्ह्यातील धनवंतरीती येथील चिमुकलीचं अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यासाठी स्थानिक नगरसेवक जीतू कटारे यांनी पुढाकार घेतला.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुलींना 'लाडली लक्ष्मी लाडली बहन' अशी नवी ओळख दिली आहे, असे नगरसेवक म्हणाले.

त्याच धर्तीवर आम्ही देखील आमच्या मुलीला लक्ष्मीस्वरूप मानून तिचे स्वागत केले, असे त्यांनी सांगितलं. मुलीच्या जन्मामुळे घरातील सदस्यही खूप आनंदात आहेत.

"देवानं आमच्या मांडीवर मुलगी ठेवल्याबद्दल आम्ही त्याचं आभारी आहोत. आम्हाला खूप दिवसांपासून कुटुंबात मुलगी हवी होती. आमच्या मुलीच्या स्वागताची तयारी आम्ही आधीच केली होती", असं चिमुकलीच्या कुटुंबीयांनी सांगितलं.

यावेळी प्रभागाचे नगरसेवक जीतू कटरे यांनी सांगितले की, आमच्या लहान भावाच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. याआधीही आम्ही माझ्या मुलीचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले होते.

















