३९ पत्नींसोबत राहतो हा व्यक्ती, बघा जगातल्या सर्वात मोठ्या फॅमिलीचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 03:50 PM2018-08-06T15:50:17+5:302018-08-06T15:55:54+5:30

मिझोरममध्ये जगातलं सर्वात मोठं कुटूंब असून या कुटुंबातील १८१ सदस्य १०० खोल्यांच्या घरात एकत्र राहतं. महागाईमुळे ४ ते ५ सदस्यांच्या कुटुंबाला आपलं पालन पोषण व्यवस्थित करणे अडचणीचं ठरत आहे, तर तेच जिओना चाना आपल्या ३ पत्नी आणि इतर सदस्यांसोबत आनंदाने राहतात.

३९ पत्नींकडून जिओना चाना यांना तब्बल ९४ अपत्ये आहेत. त्यासोबतच १४ सूना आणि ३३ नातवंडे आणि एक पंतूसोबत हे सगळे आनंदाने राहतात. आपल्या मुलांसोबत सुतारकाम करणारे जिओना यांचं कुटुंब मिझोरमच्या सुंदर डोंगरांमध्ये असलेल्या बटवंग गावात एकाच घरात राहतं.

जिओना यांना जगातल्या सर्वात मोठ्या कुटुंबाचा प्रमुख असल्याचा गर्व आहे. जिओना हे आपल्या परिवाराला मोठ्या शिस्तीने चालवतात. जिओना यांचा मोठा मुलगा नुनपरलियानाची पत्नी थेलेंडी सांगते की, परिवारातील सगळेच लोक खूप आनंदाने राहतात. कधीही भांडण होत नाही. घरातील सगळी कामे एकत्र येऊन केली जातात.

परिवारातील महिला शेती करतात आणि घर चालवण्यात योगदान देतात. जिओनाची सर्वात मोठी पत्नी घराची प्रमुख म्हणून जबाबदारी बघते. तीच घरातील सर्व कामांचं नियोजन आणि वाटप करते.

एका सर्वसामान्य घरात दोन महिने लागणारा किराणा या घरात एकाच दिवसात संपतो. इथे एका दिवसात ४५ किलो तांदूळ, ३० ते ४० कोंबड्या, २५ किलो डाळ, ६० किलो भाज्यांची गरज असते. तसेच २० किलो फळेही या घरात खाल्ली जातात.

इतक्या मोठ्या परिवारातील सदस्यांची नावे, त्यांच्या जन्मतारखा आणि इतरही माहिती लक्षात ठेवण्याबाबत जिओनाच्या मोठ्या सुनेने सांगितले की, परिवारातील सदस्यांची नावं लक्षात ठेवणं कठिण नाहीये.

ती सांगते की, लोक आपल्या अनेक मित्रांची नावे तर लक्षात ठेवतातच. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या घरातील लोकांची नावे लक्षात ठेवतो. या परिसरात चाना परिवाराला खास महत्व आहे. एकत्र एकाच परिवारातील इतके मतदान मिळत असल्याने अनेक नेते त्यांना फार महत्व देतात.

एकीकडे जिथे देशात एकत्र कुटुंब पद्धतीची परंपरा बदलत आहे. तर एकाच छताखाली इतकं मोठं कुटुंब एकत्र राहत असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसतो.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवल्या गेलेल्या या परिवाराचे सदस्य एका गावाप्रमाणेच आहेत.