मोबाईल किंवा लॅपटॉपचे चार्जर काळ्या - पांढऱ्या रंगाचे असण्याची कारणं, वापरता नेहमीच पण माहीत नसेल उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 16:53 IST2026-01-29T16:38:48+5:302026-01-29T16:53:18+5:30
Mobile Charger Colour : चार्जर केवळ पांढऱ्या किंवा काळ्या रंगाचेच का असतात? याचा कधी तुम्ही विचार केला नसेल. तुम्हालाही माहीत नसेल, पण यामागे काही खास कारण असतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Mobile Charger Colour : सामान्यपणे आपण पाहतो की, मोबाइल किंवा लॅपटॉपचे चार्जर हे काळ्या किंवा पांढऱ्या रंगांचे असतात. पण हे केवळ पांढऱ्या किंवा काळ्या रंगाचेच का असतात? याचा कधी तुम्ही विचार केला नसेल. तुम्हालाही माहीत नसेल, पण यामागे काही खास कारण असतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काळं किंवा पांढरं चार्जर असण्यामागचं कारण
या रंगांमुळे चार्जरमधून निर्माण होणारी उष्णता सहज बाहेर पडू शकते. चार्जिंगदरम्यान तयार होणारी उष्णता आत अडकत नाही, त्यामुळे चार्जर आणि त्याला जोडलेलं डिव्हाइस ओव्हरहिट होण्यापासून वाचतं. म्हणजेच, चार्जर आणि डिव्हाइस दोन्हींच्या सुरक्षिततेसाठी रंगाचं हे शास्त्र खूप उपयुक्त ठरतं.

काळा रंग उष्णता चांगल्या प्रकारे शोषून घेऊन ती बाहेर सोडतो, त्यामुळे चार्जरच्या आतलं तापमान खूप वाढत नाही. पांढरा रंग बाहेरील उष्णता रिफ्लेक्ट करतो, त्यामुळे चार्जर ऊन किंवा गरम वातावरणात बाहेरून जास्त तापत नाही.

न्यूट्रल रंगांसोबत वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचं फॉर्म्युला आधीच सर्टिफाइड असतो. त्यामुळे मोबाईल किंवा लॅपटॉप कंपन्यांना फायर सेफ्टी, शॉर्ट-सर्किट यांसारख्या अनेक सुरक्षा चाचण्या सहज पास करता येतात आणि सेफ्टी अप्रूव्हलही लवकर मिळतं. यामुळे उत्पादनासाठी लागणारा वेळ वाचतो आणि प्रोडक्शनची गती वाढते.

याशिवाय, ब्लॅक आणि व्हाइट प्लास्टिकचे दाणे इतर रंगांच्या तुलनेत स्वस्त आणि सहज उपलब्ध असतात. जर प्रत्येक फोनच्या रंगानुसार वेगवेगळ्या रंगाचा चार्जर बनवला, तर कंपन्यांना वेगवेगळ्या रंगांच्या डाई वापराव्या लागतील आणि मशिन्स वारंवार साफ कराव्या लागतील यामुळे उत्पादन खर्च वाढेल.

म्हणूनच, ब्लॅक किंवा व्हाइट चार्जर बनवणं हे फोन किंवा लॅपटॉप कंपन्यांसाठी स्वस्त, सोपं आणि व्यवहार्य ठरतं. शिवाय, डिव्हाइसच्या रंगानुसार चार्जर बनवले तर बाजारात गोंधळ निर्माण होऊ शकतो. वापरकर्त्याचा चार्जर खराब झाला, तर मॅचिंग रंगाचा चार्जर शोधणंही अवघड होईल. ब्लॅक किंवा व्हाइट चार्जर असल्यामुळे ही अडचण येत नाही.

















