भारतातील कोणत्या राज्यात आहे सगळ्यात जास्त सोनं? पाहा वेगवेगळ्या राज्यांची नावं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 16:49 IST2025-10-27T16:22:05+5:302025-10-27T16:49:55+5:30
Gold In India : काही ठिकाणी सक्रिय खाणकाम चालतं, तर काही ठिकाणी अजूनही अब्जावधी रुपयांचं सोने जमिनीखाली सुप्त अवस्थेत आहे.

Gold In India : भारताला ‘सोने की चिडिया’ म्हटलं जायचं, आणि त्यामागचं कारण फक्त इतिहास नाही तर जमिनीखाली दडलेले सोन्याचे अफाट भंडारही आहे. आजही देशातील अनेक राज्यांमध्ये सोन्याचे साठे सापडतात. पण हे लक्षात ठेवावं की ज्या राज्यांमध्ये सोने खणलं जातं आणि ज्या राज्यांमध्ये सोन्याचा साठा आहे. ती दोन्ही वेगवेगळी असू शकतात. काही ठिकाणी सक्रिय खाणकाम चालतं, तर काही ठिकाणी अजूनही अब्जावधी रुपयांचं सोने जमिनीखाली सुप्त अवस्थेत आहे.

भारतातील सोन्याचे साठे आणि उत्पादनाचा मागोवा भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) वेळोवेळी घेत असतं. या सर्वेक्षणानुसार देशातील एकूण सोन्याचा साठा आणि त्यातील किती भाग खणण्यायोग्य आहे हे ठरवलं जातं.

सध्या भारतात सोन्याचा सर्वात मोठा साठा बिहार राज्यात आहे. त्यानंतर राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या राज्यांचा क्रम लागतो. हे सर्व राज्यं भविष्यात भारताच्या स्वर्ण अर्थव्यवस्थेला बळकटी देऊ शकतात.

बिहारच्या जमुई जिल्ह्यात सुमारे २२२.८ दशलक्ष टन सोन्याचा साठा असल्याचं GSIच्या २०२० च्या अहवालात नमूद आहे. राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर असून तिथे १२५.९ दशलक्ष टन साठा आहे. राज्यातील भुकिया-जगपुरा गोल्ड बेल्ट हा सर्वात मोठा सोन्याचा प्रदेश मानला जातो.

कर्नाटक तिसऱ्या स्थानी असून येथे १०३ दशलक्ष टन सोने आहे. चौथ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश (१५ दशलक्ष टन) आणि पाचव्या स्थानी उत्तर प्रदेश (१३ दशलक्ष टन) आहे.

तसेच पश्चिम बंगाल, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रमध्येही कमी प्रमाणात सोने आढळतं. महाराष्ट्रात साधारण १.६ दशलक्ष टन सोन्याचा साठा असल्याचं सांगितलं जातं. हे सर्व आकडे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI)च्या १ एप्रिल २०२० च्या अहवालावर आधारित आहेत.

















